Wednesday, December 10, 2014

Malwani Masala (मालवणी मसाला)

बऱ्याच जणांनी माझ्याकडे मालवणी मासाल्याबद्दल विचारणा केली. एका मालवणी मैत्रिणीकडून मी हे माप आणले आहे. यावर्षी मी पण थोडासा मालवणी मसाला करून पाहणार आहे.
मालवण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. आमचे मुळगाव आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाजूच्याच रत्नागिरी जिल्ह्यात. त्यामुळे २-३ जिन्नस वगळता आमच्या घरगुती मसाल्यासारखाच हा मसाला आहे. त्यामुळे मालवणी मसाला आणि आमच्या मसाल्याच्या चवीत फारसा फरक नाही.  
 • संकेश्वरी मिरची- १ किलो
 • बेडगी मिरची- १ किलो 
 • काश्मिरी मिरची- १०० ग्रॅम (ऐच्छिक- फक्त लालभडक रंगासाठी)
 • धणे- २५० ग्रॅम
 • खसखस- २५० ग्रॅम
 • दालचिनी- २० ग्रॅम
 • लवंग- २० ग्रॅम
 • जायपत्री - १० ग्रॅम 
 • जायफळ- २ नग 
 • हळकुंड - १०० ग्रॅम
 • जिरे- ५० ग्रॅम
 • शहा जिरे - १० ग्रॅम
 • काळे मिरे- २० ग्रॅम
 • चक्री फुल / बाद्यान -  १० ग्रॅम
 • दगड फुल- १० ग्रॅम
 • बडीशेप- १०० ग्रॅम
 • मसाला वेलची- १० ग्रॅम
 • तमाल पत्र- १० ग्रॅम
 • हिंग खडे - ५० ग्रॅम
 • शेंगदाणा तेल- थोडस जरुरीप्रमाणे 
कृती: 
 • कडक उन्हामध्ये मिरच्या व सर्व मसाल्याचे पदार्थ ३-४ दिवस वाळवावेत. (मिरच्या चांगल्या कडक व्हायला पाहिजेत. मिरची हाताने तोडल्यास कटकन तुटली पाहिजे. मिरच्या कडकडीत सुकल्या असल्या की मसाला चांगला बारीक कुटला जातो आणि चाळल्यानंतर मागे उरणारा भुस्साही खुपच कमी निघतो.) 
 • मिरच्यांची देठ खुडा. मिरच्या व सर्व मसाले पाखडून, चाळून, निवडून स्वच्छ करा. काही घाण किंव्हा उपयोगी नसलेल्या गोष्टी काढून टाका. 
 • एका कढईत थोड थोड तेल घेऊन त्यात मसाल्याचे पदार्थ वेगवेगळे मंद आचेवर खमंग भाजून घ्या. करपू नका. 
 • मिरच्या आणि इतर सर्व साहित्य एकत्र मिसळुन थंड झाल्यावर डंकन/गिरणी मध्ये कुटुन आणावे. थोड्या प्रमाणात असेल तर मिक्सरमध्ये पण दळता येतो.  
 • हवाबंद डब्यात किंवा प्लास्टिकच्या पिशवीत घालून घट्ट झाकणाच्या डब्यात किंवा काचेच्या बरणीत ठेवा. लागेल तसा थोडा थोडा वापरायला काढावा. ओला हात किंव्हा ओला चमचा वापरू नये.  
 • मसाल्याचा डबा नेहमी कोरड्या आणि अंधाऱ्या जागी ठेवावा. 
 • मसाल्याचा वास आणि ताजेपणा टिकून राहण्यासाठी त्यात हिंगाचे खडे टाकून ठेवावेत. 

टिप:
जानेवारीत नव्या मिरच्या येतात. त्यानंतर  मसाला करायला घ्यावा. 


2 comments:

 1. I made it, its really tasty. Thanks very much.
  Mala fish sathi ekhada special masala sang na asel tar.

  ReplyDelete
  Replies
  1. फिश साठी असा वेगळा मसाला नाही आहे.

   Delete

आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास उत्साह मिळतो. आपला अभिप्राय, सुचना आम्हाला ज़रूर कळवा. आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच कायम राहो.