Friday, October 5, 2018

काकडीचे घारगे (काकडीचे गोड वडे)

महाराष्ट्रात घारगे/गोड वडे हे काकडी, लाल भोपळा, केळे आणि फणस वापरून बनवले जातात. कोकणात काकडीचे घारगे गणेश उत्सवात गौरी पूजन (ओवसा) च्या दिवशी तांदुळाच्या खिरीसोबत नैवेद्यासाठी केले जातात. शिवाय पितृपक्षात श्राध्दासाठी आणि सर्वपित्री आमावस्येला केले जातात. मग आज पाहूयात माझ्या आजीच्या रेसिपीप्रमाणे काकडीचे घारगे. घारगे तळताना येणार मधुर दरवळ मला नेहमीच भूतकाळात नेहतो. 

Read this recipe in English, please click here for the recipe.



साहित्य:
  • मोठी काकडी (श्रावण काकडी/तवसे)- १
  • गूळ, किसून किंवा छोटे तुकडे करून- १ कप 
  • वेलची पावडर- १/२  टीस्पून 
  • तांदुळाचे पीठ- अंदाजे १ +१/२  कप 
  • बारीक रवा- १/२  कप 
  • मोहन- २ टेबलस्पून 
  • मीठ- चिमूटभर 
  • रिफाइंड तेल- आवश्यकतेनुसार 

कृती:
  • काकडी सोलून घ्या. बिया काढून किसून घ्या. नंतर काकडीचा किस घट्ट पिळून घ्या. काकडीचा रस फेकू नका. 
  • १/२  कप काकडीच्या रसात रवा साधारण १५ ते २० मिनिटे भिजत ठेवा. 
  • गूळ आणि काकडी जाड बुडाच्या किंवा नॉन-स्टिक पॅनमध्ये एकत्र करा. 
  • मंद ते माध्यम आचेवर शिजत ठेवा. मध्ये मध्ये हलवत रहा. 
  • आता गूळ वितळू लागेल. काकडी पण शिजून त्याचे एकजीव असे मिश्रण तयार होईल. काकडी शिजायला वेळ लागत नाही, गूळ विटलेपर्यंत काकडी शिजलेली असते. खालच्या फोटोत जसे दिसतेय तसे झाले कि गॅस बंद करा. 
  • वेलची पूड टाकून छान एकत्र करा. मिश्रण थोडं होऊ द्या. 
  • परातीत तांदुळाचा पीठ घ्या आणि त्यावर मोहन टाकून एकत्र करा. 
  • आता भिजवलेला रवा, तांदुळाचे पीठ, मीठ व काकडीचे मिश्रण एकत्र करा.
  • सर्व एकत्र मळून घेऊन त्याचा गोळा बनवा. गरज लागली तरच काकडीचा रस शिंपडून मळून घ्या. मळलेले पीठ/कणिक जास्त घट्टही नको आणि खूप सैल सुद्धा नको. 
  • पिठाचा गोळा १५-२० मिनिटे झाकून ठेवा. 
  • त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्या. केळीचं पान किंवा प्लॅस्टिकच्या पेपरला तेलाचा हात लावून त्यावर तेलाच्या बोटांनीच वडा थापून घ्या. 
  • तेल चांगले गरम करून घ्या. पण वडे मध्यम आचेवर तळा. सर्व वडे सोनेरी रंगावर तळून घ्या आणि टिशू पेपरवर काढा. 
  • हे घारगे तांदुळाच्या खीरीसोबत वाढायची पद्धत आहे आणि ते तसे लागतातही छान. मला तर असेच गरम गरम मटकावयाला आवडतात पण खूपदा सणवारीच केल्याने नैवेद्य दाखवल्याशिवाय खाता येत नाहीत. 



Friday, September 21, 2018

आठवणीतील पदार्थ

आठवणीतील पदार्थ लिहायचे झाले तर मला कुठल्या हॉटेलात काय खाल्लं यापेक्षा लहांपणीच्याच आठवणी जास्त येतात. बालपणीच्या आठवणी जितक्या निर्मळ, सुखद, चिंतेचा लवलेशही नसलेल्या असतात तितक्या कुठल्याही नसाव्यात. आणि या आठवणी खास असतात त्या आजी-आजोबा, गाव, खेळताना केलेली मजा आणि अर्थातच खादाडी.

आयुष्यातली पहिली दहा वर्ष मुरुड सारख्या छोट्या गावात गेली. टीव्ही असून नसल्यासारखा. हॉटेल नव्हती आणि बाहेर जाऊन जेवायचीची पद्धतही नव्हती.  पण तरीही आई-आजीच्या हाताच्या त्या साध्याश्या स्वयंपाकाची  आणि गावात मिळणाऱ्या काही पदार्थांची चव अजून जिभेवर रेंगाळते. आजही ते पदार्थ खाल्ले की जुन्या आठवणी मनात रुंजी घालतात.

आई आणि आजीच्या हाताच्या पदार्थांची यादी भली मोट्ठी आहे. कांदेपोहे, दडपे पोहे, फोडणीचा भात, वालाचे बिरडे, अळूवड्या, कोबीचे भानवले, घावणे-गुळवणी, वालाच्या डाळीची आमटी, शेंगांची आमटी, कोकमाचे सार (सोल कढी नाही), पन्ह,  माठाची भाजी आणि रोठ (हे रोठ म्हणजे पुरीच्या आकारापेक्षा छोट्या भाकऱ्या आणि ते फक्त श्रावणातल्या शनिवारीच व्हायचे), ओल्या काजूची उसळ, मच्छीचं कालवण, भरलेल्या चिंबोरीचं कालवण, मेथीचे लाडू, ओल्या खोबऱ्याचे रवा लाडू, लसणाची चटणी, सुक्या बोंबलाची चटणी, खरवस, माडी घालून केलेलं सांदण, चुलीवरच मटण ....  अजून खूप आहे. यातले काही पदार्थ मी बनवते पण त्याला आजी-आईच्या हाताची सर येत नाही. माझ्यासाठी माझ्या आईच्या हातच्या पुरणपोळ्यांना अख्या जगात तोड नाही. तिची पोळी अगदी लुसलुशीत आणि मऊ होते, तोंडात विरघळते जणु.


आजी सकाळी उठली की खिमटाचं मोठ्ठ पातेलं चुलीवर ठेवायची. उकळी आली की पातेल वैलावर जायचं आणि रटरटत राहायचं. आम्ही चुलीसमोर बसून आईने ढोसेपर्यंत दात घासत बसायचो. यथावकाश सगळ उरकलं की खिमट खायला बसायचं. उपवासाच्या वारी लोणचं व भाजलेला तांदळाचा पापड आणि इतर दिवशी चुलीत भाजलेले सुके बोंबील किंवा वाकट्या तोंडीलावण म्हणुन मिळायच्या. ते गरम गरम खिमट ओरपताना ब्रम्हानंदी टाळी लागायची. रीसोतोच्या तोंडात मारेल अशी चव.

अशीच एक आठवण आहे ती 'ऋषीची भाजी'ची. माझ्या लहानपणी, माझी आजी हि भाजी चुलीवर मोठ्या मातीच्या भांड्यात बनवायची. फक्त बायकांचाच उपवास असल्याने प्रथम नेहमीचे जेवण आणि नैवेद्य व्हायचा. आजी आणि मोठी काकू मागच्या पडवीत भाज्या सोलत-चिरत बसलेल्या असायच्या. आम्हा मुलांचे आणि पुरुषांचे जेवण एक वाजताच उरकायचे. मग आम्ही सगळी मुलं मागच्या अंगणात डोकावायला जायचो. या बायकांचा हा कुठला खास पदार्थ चाललाय या बाबत कुतुहल असायचं. आजी बोलवायची खायला. पण भाजीचा रंग आणि त्यातल्या पालेभाज्या बघून पळून जायचो. मग एकदा कधीतरी हि भाजी चाखून बघितली. आणि मग नंतर खाताखाता हळूहळू हि भाजी आवडू लागली. आजीच्या त्या मातीच्या भांड्यातील भाजीची चव काय औरचं होती. मी ती चव कधीच विसरू शकत नाही. आणि आज हे तिला सांगायला आजीही नाही आणि मोठी काकूही नाही. आजही ऋषी पंचमीला आजीची आणि काकूची खूप आठवण येते.


आमच्या गावाला खूप यात्रा असायच्या. खेळणी आणि चक्रवाराच्या घोड्यावर बसण्याशिवाय अजुनही खास आठवते ती यात्रेतील कांद्याची भजी, उसाचा रस आणि सुतरफेणी. त्यावेळेला ह्या छोट्याश्या गोष्टीच पण फार अप्रूप होत. हनुमान जयंतीची यात्रा एप्रिल मध्ये शेजारच्या 'खारांबोली' गावात असायची. तिथे आमचे एक ओळखीचे कुटुंब राहायचे. यात्रेला गेलोकी त्यांच्या शेतघरावर जाण ठरलेलं असायचं. तिथे त्यांच्या मळ्यातील ताजी ताजी रसदार कलींगडे आणि उकडलेल्या वालाच्या शेंगा. आहा ! 

गोकुळ अष्टमीला आमच्याकडे एक खास नैवेद्य असायचा. तांदूळ पाण्यात भिजत ठेवायचे नंतर ते सुकवून, भाजून दळायचे शक्यतो जात्यावरच. त्यापिठाचे लाडू बनवायचे. अष्टमीला मध्यरात्री हे लाडू, थालीपीठ, दही आणि दह्यात भिजवलेले हे पीठ असा नैवेद्य असे. हे पीठ म्हणजे जादूच वाटायची. दह्यात, दुधात, गुळाच्या पाण्यात किंव्हा अगदी चहात पण हे पीठ भिजवून खायचो. आज मला स्वतःलाच आश्चर्य वाटत की हे मी कस खायची, पण खरंच कशातही बुडवून खाल्लेल ते पीठ तेव्हा जाम आवडायचं.    

माझा खिसा (त्यावेळी फ्रॉकला मोठ्ठाले खिसे असायचे) अल्लुद्दीनचा खजिना असायचा. चणे-शेंगदाणे, चिंचा, बोरं, आवळे, भाजलेले चिंचुके आणि अगदी बोरांच्या बीयापण. बोरांच्या बीयापण सोडल्या नाहीत आम्ही, फोडून आतला गर खायचो. माझी आजी मला रोज मधल्या सुट्टीत चार आणे द्यायची. त्यात काय काय यायचं. १० पैशाला मिळणार आवळा सुपारीच पाकीट, पेपरमिंटच्या गोळ्या लिमलेटच्या गोळ्या. शिवाय आम्ही मैत्रिणी एका आवळ्याच्या बदल्यात एक बोर इत्यादी प्रकारचे व्यवसाय करायचो. एकदा आवळा सुपारी ऐवजी मिलन सुपारी घेतली आणि कस कोण जाणे ते आजीला कळलं आणि असा मार मिळाला आहे ना आजीकडून कि त्या मिलन सुपारीकडे बघायची पुन्हा हिंमत झाली नाही. शिवाय पुढे कितीतरी दिवस चार आणे मिळायचे बंद झाले होते. हा खिश्याचा खजिना दिवाळी फराळ बनवताना पण चांगलाच फुगायचा. पुढ्यातल्या थाळ्यातून हाताला येतील तितक्या चकल्या, शंकरपाळ्या आणि बोर बचाकभर उचलायची आणि खिश्यात भरायची आणि मग निवांत तुटलेल्या भिंतीवर नाहीतर सतीच्या पारावर बसून निवांत खायची. बोरावरून आठवलं, एकदा बोरं खाताना हलणारा दुधाचा दात हातात आला होता. हि बोरं म्हणजे तांदळाचे पीठ गुळाच्या पाण्यात घट्ट भिजवायचे आणि बोराएवढ्या आकाराचे गोळे करून तळायाचे. कडक असतात हि बोरं, तोंडात धरून चघळून चघळून मऊ होतात मग खायची.

मुरुडला घराच्या आजूबाजूला सगळीकडे वाड्या. त्यात नारळीफोपळीच्या जोडीला आंबे, पेरू, जांभळ, जाम, फणस अशी किती तरी झाड, झाडावर चढुन नाहीतर दगड मारून हि फळं पडायचो. खापट्या कैऱ्या आणि पेरू पाडून तिखट-मीठ लावून खायचो. मग आजीच्या लक्षात आलं की म्हणायची अरे त्यांना जरा त्यांना मोठं तर होऊ द्या, घसा खवखवेल अश्याने. पण आम्हाला कुठला धीर. त्यावेळी घसाही खवखवला नाही कि कधी दातही आंबले नाहीत. आता तर काही आंबट खायच्या कल्पनेनंच माझे दात आंबतात. जामाला गुलाबी रंगाची फुल येतात ती पण खायचो. आता नाव आठवत नाही पण कुठलीतरी फुल असायची त्याचा गोड गोड  रस चुपायचो. कुंपणाला चिंचणीची झाड येतात त्याला शेंगा असतात, त्या पण खायचो. कहर म्हणजे चिंचेचा आंबट कोवळा पाला पण खायचो आम्ही.        

मुरुडला एक भेळवाले पितांबरभय्या होते. तिथली भेळ हि तिच्या सारखी तीच. कुठल्याही चटण्या नसलेली, उकडलेले पांढरे वाटाणे आणि जाडी गाठी असणारी ती एक अदभूत भेळ होती. आजही ते दुकान आहे पण तशी भेळ मिळत नाही. गद्रेंचा बटाटावडा आणि रामूभय्याचा हिरव्या वाटण्याचं सारण असलेला पातीचा सामोसा खायला मिळणं  म्हणजे पर्वणीच. फक्त वडाच मिळायचा, खऱ्या खोबऱ्याच्या चटणीसह. वडापाव हा प्रकार नसायचा. पाव फक्त बेकरीतच. आता गद्रेंच हॉटेल बंद झालय आणि रामूभय्याचा सामोश्याची चव पार रसातळाला गेलीय.

मुरुडला पूर्वी बेकरीत एक 'बिस्कुट' नावाचा प्रकार मिळायचा. हा पाव आणि बटर (चहात बुडवून खायचे) याच्या मधला पदार्थ होता. पाव सारख्याच त्याच्या लाद्या असायच्या. दुपारी चहा वाजले कि एक पाववाला 'पाव-बिस्कुट-खारी' असं ओरडत यायचा. त्याची साद ऐकून घरोघरी चुलीवर चहाची आधण चढत असतील. खारी त्यामानाने बरीच महाग असायची, त्यामुळे 'बिस्कुट' घेण्यावरच सगळ्यांचा भर असायचा. अर्थात ती बिस्कुट चहासोबत लागायची पण भारी. त्याच्याकडे 'लिमजी' पण मिळायची. नानखटाईच्या जवळपासचा हा पदार्थ, पण मला हा फारसा आवडत नसे. 'सर्दी खोकला, झटकन मोकला' असं ओरडत एक आलेपाकवाले आजोबा यायचे. सर्दी झाली असो कि नसो पण ते आजोबा आले कि माझी आजी त्यांच्याकडून १-२ आलेपाक विकत घ्यायचीच. आज मला असं वाटत कि त्यांना थोडीफार मदत व्हावी असा तिचा हेतू असावा. शिवाय फार महागही नसे आणि चांगला असायचा, एकदम घरगुती चव.
       
आमच्या मुरुडच्या बाजारात त्याकाळात फक्त स्थानिक फळ आणि भाज्यांचं मिळायच्या. आजूबाजूच्या खेडेगावातून भाज्या यायच्या. त्यात चवीला खास असणाऱ्या भाज्या असायच्या त्या कोर्लईच्या. कोर्लईच्या मायकडची रताळी आणि वांगी चवीला अप्रतिम. त्या मायशी बोलणं आणि भांडणं तर फारच सुंदर. ह्या माय म्हणजे भाजीवाल्या, पोर्तुगीज लोकांचे वंशज. त्यांचं ते हेल काढून बोलणं तर ऐकत रहावं.

उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे सगळ्यात आनंदाचा काळ. मनोसोक्त खेळणं आणि सगळ्या आवडत्या पदार्थांची रेलचेल. गुपचूप चोरून खाण्यात कसली मजा असते ना! आंबोशीसाठी सुकत घातलेल्या कैरीच्या फोडी, कोकमं, चिंच आणि पापड पण. काही वर्ज्य नव्हतं.  हापूस आंब्यांपेक्षा मला आवडायचे ते छोटे चुपायचे आंबे. आम्ही सगळे मिळून जवळजवळ  टोपलीभर आंबे दिवसभरात फस्त करून टाकायचो. फणसाचे गरे खाऊन तर नंतर कंटाळा यायचा. कोंबडा की कोंबडी करत करवंद खायचो. चिकटलेले ओठ सोडवत रांजणं खायचो. ओठाला जांभळाची लिपस्टिक लावायचो. काय काय केलं अन काय काय खाल्लं. दिवसभर काही ना काही चरत असायचो पण इतकं खेळायचो की जेवणाची वेळ होईपर्यंत कडकडून भूक लागलेली असायची. शिवाय एक कुल्फीवाला यायचा, सुट्टीत रोज दुपारी एक चार आण्याची कोनातली कुल्फी मिळायची. कधीकधी बर्फाचा गोळा तर कधी आईसप्रुट पण मिळायचा. आईसप्रुट म्हणजे आता मँगो कँडी येते तसलाच गावठी अवतार. मला सगळ्यात जास्त आवडायचा तो बर्फाचा गोळा, पण त्यासाठी आजीला फार मस्का लावावा लागे.      

अजूनही आठवते ती त्यावेळची मुंबईची कचोरी आणि मसका जीरा बटर. मावशी मुंबईवरून येताना खास घेऊन यायची. त्यावेळी ह्या गोष्टी स्वर्गीय वाटायच्या, आता काही त्यात मजा वाटत नाही. आणि मुरुड-मुंबई प्रवासात आवर्जून घ्यायची एक गोष्ट होती ती म्हणजे साळावची चिक्की. हो, तीच ती खोबऱ्याची चिक्की, जी अलिबाग-रेवदंड्यात मिळते. पूर्वी साळावची चिक्की म्हणून प्रसिद्द होती. तिच्या चवीतही खूप फरक पडला आहे.
      
आमच्या घरातले डबे बिस्किटं, चॉकलेट, केक, फरसाण अश्या पदार्थानी भरलेले नव्हते. लहानपणी हे पदार्थ कधी मला खायला मिळाले नाहीत असही नाही. पण बाकीच्या इतर गोष्टी इतक्या होत्या की या गोष्टींची चटकच लागली नाही.
अजून खूप काही लिहिण्यासारखं, पण आता इथे आवरतं घेते आहे. आठवणी जपण्यासाठी मी माझ्या ब्लॉगवर आजी-आईच्या जुन्या पाककृती संग्रहित करून ठेवण्याचा प्रयत्न करते आहे.
खरतरं ह्या खूप साध्या गोष्टी आहेत, खूप जणांनी  हे असं अनुभवलं असेल. तरीही मला हे लिहावंसं वाटलं, कारण या आठवणी खूप खास आहेत, मनाच्या कुपीतील अत्तरच जणु. अजूनही ती कुपी उघडली की घमघमाट सुटतो आणि मन वेडं होतं.        

 हा लेख 'मिसळपाव' या संकेतस्थळावर एका लेखमालेत पूर्वप्रकाशित झाला आहे. 

Thursday, August 16, 2018

वालाच्या/पावट्याच्या डाळीची आमटी


आपण वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी खात असतो. वालाची/पावट्याची डाळ हा प्रकार फारसा प्रचलित नाही. महाराष्ट्र आणि गुजरात मध्येच हि डाळ वापरली जाते. त्यातही कोकणातच त्याचा वापर जास्त केला जात असावा. वाफाळलेल्या भातासोबत हि वालाची आमटी आणि तव्यात खरपूस परतून घेतलेली भेंड्याची भाजी किंवा तळलेली मासळी किंव्हा तव्यात कांद्यात परतलेली सुकट/सुका जवळा म्हणजे माझ्यासाठी ब्रम्हानंदच ! 



वालाची डाळ: 
आम्ही दरवर्षी वाल  घेतो. मग निवडताना त्यातले लाल रंगाचे वाल असतात ते कुचार किंवा मुके  असतात म्हणजे त्यांना मोड येत नाहीत ते बाजूला काढायचे. त्याची गिरणीत डाळ करून मिळते.  वरील फोटोमधील डाळ गिरणीतून करून आणली आहे. पण दुकानातही वालाची डाळ मिळते.

साहित्य:

  • वालाची/पावट्याची डाळ- १/२  कप (साधारण १ वाटी)
  • ओलं खोबरं, खोवून किंवा किसून- २ टेबलस्पून
  • जीरे- १ टीस्पून
  • लसूण- ४ ते ५ पाकळ्या
  • कांदा, चिरून- १ छोटा किंवा १/४ कप
  • घरगुती मिक्स मसाला/ मालवणी मसाला- १ टीस्पून (१/२  टीस्पून मिरची पूड + १/२  टीस्पून गोडा मसाला)
  • तेल- २ टेबलस्पून
  • हिंग- १/४  टीस्पून
  • हळद- १/२  टीस्पून
  • मोहरी- १  टीस्पून
  • कडीपत्ता- ४ ते ५ पाने
  • गूळ- १/४  टीस्पून
  • आमसूल/कोकमं - २ ते ३
  • मीठ- चवीनुसार
  • कोथिंबीर- १/४  कप



कृती:

  • वालाची/पावट्याची डाळ स्वच्छ धुवून किमान २-३ तास भिजत ठेवावी. 
  • ओले खोबरे, जिरे आणि लसूण वाटून घ्यावे. (काही मिक्सरला असं इटुकलं पिटुकलं वाटण कधी कधी  नीट होत नाही. पूर्वी पाट्यावर केलं जायचं छान ! अश्या छोट्या वाटणाला माझी आजी खोबऱ्याची गोळी म्हणायची.) 
  • डाळ शिजतानाच त्यातच हे वाटण घालावे. मस्त वास येतो डाळीला. काही लोक डाळ उकळताना पण घालतात. 
  • तूरडाळीप्रमाणेच हि डाळ कुकरला शिजवून घ्यावी. हि डाळ शिजायला जरा जास्त वेळ लागतो. अंदाज घेऊन १-२ शिट्टी जास्त घ्यावी. 
  • डाळ चांगली शिजल्यावर घोटून घ्यावी. 
  • एका कढईत किंवा पातेल्यात तेल गरम करून घ्यावे. मोहरीची फोडणी द्यावी, तडतडली कि त्यात कांदा, कढीपत्ता, हिंग, हळद, मोहरी घालावे  आणि थोडा वेळ परतून घ्यावे. 
  • त्यात घरचा मिक्स मसाला किंवा (मिरची पूड+गोडा मसाला) घालावा व जरासं परतून 
  •  त्यावर घोटलेली डाळ घालावी. जरुरीप्रमाणे पाणी घालावं. 
  • त्यात चवीप्रमाणे मीठ, गूळ, आमसूल घालवं आणि छान उकळी काढावी. 
  • वरून कोथिंबीर टाकावी. झाली तयार आमटी. गरमागरम  भाताबरोबर वाढावी. 


Thursday, June 14, 2018

वालाच्या कोवळ्या रोपांची भाजी

पहिल्या पावसानंतर दोन दिवसातच हि भाजी बाजारात दिसू लागते आणि त्यानंतर साधारण आठवडाभर मिळते. वालाच्या शेंगा काढल्यावरही काही शेंगा किंवा दाणे शेतात पडून असतात. पावसाचे पाणी पडल्यावर त्याला कोंब धरतात, लगेच १-२ दिवसात त्याची अशी छोटी रोपे तयार होतात. अशी हि कोवळी रोपे खुडून त्याची भाजी केली जाते. गरमागरम तांदळाच्या भाकरीसोबत हि भाजी खूप मस्त लागते. 



साहित्य:
  • वालाची कोवळी रोप कापून, चिरून - १ कप (एक जुडी)
  • कांदा, चिरून- १माध्यम किंवा १ कप 
  • लसूण पाकळ्या, ठेचून - ५ ते ७
  • मोहरी-  ½ टीस्पून 
  • जीरे- ½ टीस्पून 
  • हिंग- ¼ टीस्पून 
  • हळद- ½ टीस्पून 
  • घरचा मिक्स मसाला- २ टीस्पून किंवा (१ टीस्पून मिरची पूड +१ टीस्पून गोडा मसाला)
  • गुळ- ¼ टीस्पून (ऐच्छिक) 
  • कोकम/आमसूल- १
  • मीठ- चवीप्रमाणे 
  • तेल- २ ते ३ टेबलस्पून 
  • ओले खोबरे, खोवुन - २ टेबलस्पून (ऐच्छिक) 

कृती:
  • रोपांची मुळे आणि वालांना चिकटलेली साले काढून टाका. भाजी स्वच्छ धुवून घ्या, माती असते.
  • भाजी चिरून घ्या.
  • पॅनमध्ये तेल गरम करून मोहरी टाकावी. मोहरी तडतडली की जीरे, कांदा, लसुण टाकून परतावे.   
  • कांदा गुलाबीसर झाला की त्यात हळद, हिंग, मसाला (मिरचीपूड टाकत असाल तर ती) टाकून जरासं परतून घ्यावं. 
  • आता त्यात चिरलेली भाजी व मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करावं. वरून थोडसं पाणी शिंपडून झाकण ठेवावं १५ ते २० मिनिटे मंद आचेवर शिजवावं. झाकणावर पाणी ठेवलं तरी चालेल, करपायची भीती नाही. शिजताना भाजी मध्ये मध्ये हलवावी. 
  • भाजी व्यवस्थित शिजली की त्यात गुळ, कोकम आणि खोबरं घालावं. मस्त परतून मिक्स करावी.  
  • गरमागरम भाकरी सोबत किंवा डाळ-भातासोबत वाढावी. 


नोट्स: 

  • मसाला ऐवजी हि भाजी हिरवी मिरची फोडणीत चालून पण करतात. 
  • भाजी थोडी कडवट असते म्हणून थोडासा गुळ किंवा साखर लागते. 
  • मीठ घालताना काळजीपूर्वक घालावे, भाजी शिजल्यावर आळते. 
  • तुम्ही हि भाजी घरी सुद्धा उगवू शकता. ट्रे मध्ये वाल पेरून हे शक्य आहे. 

Tuesday, April 10, 2018

घोसाळ्याचं भरीत

घोसाळ्याचं भरीत करण्याची पद्धत वांग्याच्या भरीतापेक्षा खूप वेगळी आहे, पण त्याच्यासारखाच अतिशय चविष्ट आणि खमंग लागतं.  



घोसाळी (Green Sponge Gourd) :


साहित्य:
घोसाळे - ३
कांदा, बारीक चिरून - १ कप
कोथिंबीर, बारीक चिरून- मुठभर
हिरवी मिरची, तुकडे करून- ३ ते ४
मोहरी- १ टीस्पून
हळद- १/२  टीस्पून
हिंग- १/२  टीस्पून
तेल- ३ ते ४ टेबलस्पून
मीठ- चवीनुसार
गुळ- चिमूटभर किंवा आवडीनुसार
चिंच- बोराएवढी

कृती:
  • चिंच आणि गुळ एकत्र करून त्याचा घट्ट कोळ बनवा.  
  • घोसाळी धुवून घ्या आणि त्याच्या सालीचा खरखरीत भाग खरडून काढा. बटाट्यासारखी त्याची साले काढू नका. घॊसळी कवळी असतील तर सालं खरडायाची पण गरज नाही. 
  • बटाट्याच्या काचऱ्या करतो तश्या काचऱ्या करा. 
  • जाड बुडाची कढई घ्या. मी भाकरीसाठी वापरला जाणारा खोलगट लोखंडी तवा वापरते. या तव्यामुळे घोसाळे छान खमंग परतले जाते.  
  • तवा/कढई गरम करून त्यात तेल गरम करा. मोहरी टाका, ती तडतडली कि त्यात हिरव्या मिरच्यांचे तुकडे टाकून खमंग परता. 
  • त्यावर हळद हिंग घालून  जरासं परता.  
  • घोसाळ्याच्या काचऱ्या टाका आणि परता.  
  • मीठ टाकून मिक्स करून घ्या आणि परतत रहा जोपर्यन्त घोसाळ्याला सुटलेले पाणी आटुन त्याचा लगदा तयार होईल आणि तेल सुटू लागेल. 
  • हा शिजलेला घोसाळ्याचा लगदा एका बाउल मध्ये काढून घ्या. (लोखंडी भांडे असेल तर लगेच काढायला हवा नाहीतर त्याचा एक विशिष्ट वास भाजीला येतो.) 
  • थंड झाल्यावर त्यात चिरलेला कांदा व कोथिंबीर आणि चिंचेचा कोळ टाकून मिक्स करा. भरीत तयार आहे.  
  • हे भरीत गरमागरम भाकरीसोबत अतिशय रुचकर लागत.  

Saturday, March 24, 2018

आंबेडाळ ~ कैरीची डाळ

चैत्र. शु. तृतीया ते अक्षय तृतीया असे महिनाभर चैत्रागौरीचे पूजन केले जाते. या महिन्यात कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी हळदीकुंकवाचा समारंभ करतात. हळदी-कुंकवाला आलेल्या सुवासिनी व कुमारिकांची भिजवलेल्या हरबर्‍यांनी आणि फळांनी त्यांची ओटी भरतात. त्यांना कैरीची डाळ व पन्हे देतात. कर्नाटकात व महाराष्ट्राच्या सीमावर्तीय भागात चित्रान्न केले जाते.
तर पाहू या कैरीच्या डाळीची रेसिपी. 



साहित्य: 
  • कैरी, किसून- १/४  कप (कमी आंबट असेल तर जास्त घ्यावी.)  
  • चणा/ हरबरा डाळ- १/२ कप 
  • हिरव्या मिरच्या- २ ते ३ (चवीप्रमाणे कमीजास्त कराव्यात) 
  • आल्याचा तुकडा- १/२ इंच
  • खोवलेले ओले खोबरे- १/४ कप  
  • साखर- चिमुटभर 
  • मीठ- चवीप्रमाणे 
  • कोथिंबीर, बारीक चिरून- २ टेबलस्पून 
  • तेल- २ टीस्पून 
  • मोहरी- १/२  टीस्पून 
  • हिंग- १/२  टीस्पून 
  • हळद-  १/२  टीस्पून 
  • लाल ब्याडगी मिरची- १ 
  • कढीपत्ता- ३ ते ४ पाने (ऐच्छिक)

कृती:
  • चणा डाळ सध्या पाण्यात कमीतकमी ४ तास भिजत घालावी. 
  • कैरीची साल काढुन खिसुन घ्यावी. 
  • हिरव्या मिरचीचे मध्यम तुकडे करावेत, आल्याची साल काढुन त्याचे पण तुकडे करावेत.
  • भिजवलेल्या डाळीतील सर्व पाणी काढून टाकावे व मिक्सरवर आले व मिरचीसोबत भरडसर वाटून घ्यावी. (कैरी खिसली नसेल तर मिक्सरमधे डाळीसोबत वाटली तरी चालते.)
  • ओले खोबरे, मीठ व साखर घालुन सगळे एकत्र नीट मिसळुन घ्यावे.
  • कढल्यात किंवा छोट्या पॅनमध्ये तेल तापवून मोहरी, लाल मिरची तोडून घालावी. मोहरी तडतडल्यावर हिंग, हळद, कढीपत्ता घालुन खमंग फोडणी करुन डाळीवर घालुन अजुन एकदा नीट मिसळुन घ्यावे. 
  • वरुन बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.

Thursday, February 15, 2018

मेथीगोळ्यांची रस्सा भाजी

मेथीच्या भाजीला नाक मुरडणारे सुद्धा हि भाजी आवडीनं खातात असा अनुभव आहे. कडूपणा अजिबात जाणवत नाही. गरमागरम भाकरीसोबत तर मेथीगोळ्यांची रस्सा भाजी फारच छान लागते.



साहित्य -
मेथी गोळे बनवण्यासाठी:
  • बारीक चिरलेली मेथी - १ ते सव्वा कप
  • बेसन किंवा भाजणी- १/२ ते पाऊण कप
  • तीळ- १/२ टीस्पून
  • घरगुती मसाला किंवा लाल तिखट - १ टीस्पून
  • हळद- १/२ टीस्पून
  • मीठ - चवीनुसार

रस्सा बनवण्यासाठी:
  • तेल - ३ टीस्पून 
  • मोहरी - १/२ टीस्पून 
  • जिरे - १/२ टीस्पून 
  • हिंग - १/२ टीस्पून 
  • हळद - १/२ टीस्पून 
  • कांदा- १ मध्यम (१/२ कप)
  • लसूण पेस्ट किंवा भरड - २ टीस्पून 
  • घरगुती मसाला किंवा काळा मसाला - ३ टीस्पून किंवा ( १ १/२ टीस्पून मिरची पूड+ १ टीस्पून गरम मसाला + १/२ टीस्पून धणे पूड)
  • भाजलेल्या सुक्या खोबऱ्याचे वाटण- १ टीस्पून (कारण हा रस्सा पातळच असतो आणि गोळ्यातील बेसन पण रश्श्यात उतरून थोडा घट्टपणा येतो.)
  • मीठ - चवीनुसार

कृती-
  • मेथी निवडून स्वच्छ धुवून घ्यावी. चाळणीवर टाकून निथळुन घ्यावी व बारीक चिरून घ्यावी.
  • मेथी गोळे बनवण्यासाठी लागणारे सर्व साहित्य एकत्र करून घट्टसर पीठ भिजवावे. 
  • एका कढईत तेल तापवून त्यात मोहरी व जिऱ्याची फोडणी करावी. त्यात कांदा आणि लसुण घालून गडद तपकिरी रंगावर परतून घ्यावे. 
  • त्यात हळद, हिंग, मसाला घालून थोडा वेळ परतून घ्यावे. 
  • त्यातच खोबऱ्याचे वाटण घालून तेल सुटेपर्यंत परतावे. 
  • त्यात साधारण २ वाट्या पाणी घालून उकळी आल्यावर त्यात मेथीचे छोटे छोटे गोळे एक-एक करीत सोडावेत. 
  • उकळी आल्यावर झाकून २-३ मिनिटे वाफवावे. 
  • गॅस बंद करून रस्सा झाकून ठेवावा म्हणजे रस्सा गोळ्यात मुरेल. गरमागरम ज्वारीच्या किंवा कुठल्याही भाकरीसोबत सर्व करावे. 
टिपा-
  • गोळे बनविताना त्यात तिखटाऐवजी वाटलेली हिरवी मिरचीही वापरता येइल. 
  • प्रथम गोळे तळून नंतर रश्श्यात सोडता येतील. 

Thursday, February 8, 2018

Popati (पोपटी)

पोपटी हा कोकणातला खरंतर  रायगड जिल्ह्यातला लोकप्रिय पार्टी पदार्थ....... देशावर हुरडा पार्टी, भरीत पार्टी होतात तश्या कोकणात हिवाळ्यात पोपटी पार्टी होतात. काळोख्या थंडी पडलेल्या रात्रीत शेकोटीवर शेकत शेकत गरमा गरम पोपटीचा आस्वाद घेतला जातो.
पोपटी पुर्णपणे नैसर्गिक साधनांचा उपयोग करुन केली जाते. पोपटी करण्यासाठी लागणार्‍या साहित्यामधले लागणारे महत्वाचे साहित्य म्हणजे मातीच मडक. हे मडक गरजेप्रमाणे छोटे मोठे घेतात. मडके आतुन स्वच्छ धुवुन पुसुन घेतात. पोपटी ही हिवाळ्यात तयार होणाऱ्या वालाच्या शेंगा, भाज्यांची केली जाते. तसेच आवडीप्रमाणे वांगी, बटाटे, कांदे, तुरीच्या शेंगा, चवळीच्या शेंगा व रताळी वापरली जातात.  हल्ली अंडी व चिकन टाकुनही पोपटी केली जाते व हि मांसाहारी पोपटी जास्त लोकप्रिय बनली आहे.




पोपटी खायला या.......

(फोटो बघून असं वाटलं असेल ना... एवढ्या मोठ्या मडक्यात एवढुसचं काय ते! दरवेळी ठरवते कि या वेळी चांगला फोटो काढायचा. आणि दरवेळेला होत काय मडकं ओतलं रे ओतलं की सगळे त्यावर तुटून पडतात.)

पोपटी कशी करायची ते पाहुयात.
सर्वप्रथम चिकन धुवून मीठ, आलं-लसूण-कोथिंबीर पेस्ट, मसाला (कोकणी, आगरी, कोळी, मालवणी किंवा  संडे असा कुठलाही मसाला चालेल.) मॅरीनेट करावं.  चिकनला चिरा पाडाव्यात म्हणजे मसाला आतपर्यंत मुरतो. २-३ तास तरी चिकन मॅरीनेट व्हायला  हवं.  नंतर केळीच्या पानात चिकन बांधुन त्याचे पॉकेट बनवावेत.


शेंगा धुवून मीठाच्या पाण्यात किमान अर्धा तास तरी बुडवून ठेवाव्यात. म्हणजे शिजल्यावर पचक्या लागत नाहीत आणि पाण्यात भिजवल्यामुळे शिजल्यावर सुकत नाहीत आणि पटकन करपत नाहीत. आम्ही वालाच्या आणि चवळीच्या शेंगा वापरतो.

भाजीत भरण्यासाठी मसाला तयार करून घ्यावा. ताज ओल खोबरं, घरगुती मसाला, हळद, हिंग, ओवा, मीठ, कोथिंबीर आणि हिरवी मिरची+लसूण+जीरे याचे भरड वाटण हे सर्व एकत्र करून मसाला तयार करावा. हवं असल्यास या मसाल्यात लिंबूचा रस टाकला तरी चालेल.

कांदे, बटाटे, वांगी यांना अधिक च्या आकारात चिरा पाडाव्यात व त्यात वरील मसाला भरून घ्यावा.

रताळी धुवून मीठ चोळून ठेवा.

अंडी स्वच्छ धुवून घ्यावीत.

पाण्यात भिजवलेल्या शेंगा बाहेर काढून त्यावर खडे मीठ आणि ओवा टाकून घ्यावा.  वरील मसाला उरला असेल तर तो पण शेंगाना चोळावा.
पोपटीसाठी वापरली जाणारी मडकी पण पाण्यात भिजवून ओली करून घ्यावी. मडक्यात भरलेले आतील जिन्नस जळू/करपू नयेत म्हणून पूर्वीपासूनच एक विशिष्ट वनस्पतीचा/भांबुर्डीचा पाला वापरतात. भांबुर्डी ही वनस्पती शेतात, बांधावर ओसाडजागी भरपुर आढळते. ह्या वनस्पतीला एक विशिष्ट वास असतो. हया वनस्पतीचा जखमा भरण्यासाठीही औषधी उपयोग केला जातो.

मडक्यात तळाशी आणि मडक्याच्या सर्व भिंतीना सील केल्याप्रमाणे हा पाला पसरवायचा. त्यानंतर शेंगा, त्यावर भाज्या, रताळी त्यावर अंडी, त्यावर चिकनची पार्सल व वरून परत शेंगा आणि पुन्हा वरून भांबुर्डीचा पाला दाबून भरायचा आणि मडक्याच तोंड बंद करायचं. इतका तो पाला दाबून भरायचा कि आतले  जिन्नस बाहेर आलं नाही पाहिजे. शक्यतो आम्ही भाज्या आणि चिकन-अंडी भरलेली अशी वेगवेगळी मडकी करतो. 



पोपटी शिजवण्यासाठी मोठ्या शेकोटीसारखा जाळ आवश्यक असतो. म्हणून मोकळी जागा हवी. मोठ्या अंगणात किंवा शेतात, बागेत ही पोपटी पार्टी साजरी केली जाते.
मोकळ्या जागी ते मडक बसवण्यासाठी साधारण एक विताएवढा आणि मडक्याच्या तोंडाच्या आकारापेक्षा थोडा मोठा खड्डा खणला जातो. त्या खड्ड्यात सुकलेला पाला-पाने किंवा पेंडा टाकुन त्यावर मडके उलटे ठेवले जाते. म्हणजे खड्यात मडक्याचे तोंड असते.

आता मड्क्याच्या भोवती सुकी लाकडे, नारळाच्या झावळ्या किंवा गवत/पेंडा आणि शेणाच्या वाळलेल्या गोवऱ्या लावुन त्याला आग लावली जाते.


साधारण पाऊण तास लागतो पोपटी शिजायला. गुलाबी थंडी आणि बाहेरचा गार वारा अंगाला झोंबायला लागतो अश्यावेळी ह्या पोपटीच्या शेकोटीच्या जवळ शेक घेतघेत पार्टीचे खेळ, गप्पा गोष्टी रंगात येतात.
साधारण ४०-४५ मिनिटांनी खमंग, खरपूस सुवास येऊ लागला पोपटी तयार. जाणकारांकडे पोपटी तयार झाली कि नाही यासाठीच्या क्लुप्त्या पण असतात.  :)


आधी भांबुर्डीचा पाला काढून केळीच्या पानावर किंवा पेपरवर मडक रिकामं केलं जातं. 

आणि ..... आणि काय बस तुटून पडा. गरम असतानाच पोपटीचा आस्वाद घ्यायचा.  

Monday, January 29, 2018

भेंडीची आमटी

तळकोकणात व गोवा-कारवार कडे या पद्धतीची भाज्यांची आमटी केली जाते. हि आमटी वाफाळत्या भातासह रवा लावून तळलेल्या सुरण किंवा नीर फणसाच्या काप्यासह फारच अप्रतिम लागते. कधीतरी आपल्या नेहमीच्या डाळीच्या आमटीला सुट्टी देऊन करायला काहीच हरकत नाही.





साहित्य:
  • भेंडी- २५० ग्रॅम
  • मीठ- चवीनुसार 
  • कोथिंबीर, चिरून- १ टेबलस्पून
  • कांदा- १ लहान 
  • ओले खोबरे, खोवून- १/२ कप 
  • लसूण- ४ पाकळ्या
  • लाल सुक्या बेडगी मिरच्या- ४ ते ५ (किंवा मिरची पूड- १ टीस्पून )
  •  धणे- १ टीस्पून
  • जीरे-  १ टीस्पून
  • बोराएवढी चिंच (किंवा १ टेबलस्पून चिंचेचा कोळ)
  • मेथीदाणे- १/४  टीस्पून 
  • मोहोरी- १ टीस्पून 
  • हिंग- १/४ टीस्पून 
  • हळद- १/२  टीस्पून 
  • कढीपत्ता- ५ पाने 
  • तेल- ३ टेबलस्पून (कृती मध्ये याविषयी सविस्तर वाचावे.) 

कृती:
  • चिरलेला कांदा, ओले खोबरे, लसूण, सुक्या मिरच्या, धणे, जिरे आणि चिंच  असे सर्व एकत्र साधारण १/४ कप गरम पाण्यात भिजवावेत. १५-२० मिनिटानी मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटून घ्यावे.
  • भेंडी धुवून पुसून घ्यावी. दोन्ही कडेची देठं कापून उभी चिरावीत. जर भेंडी आकाराला लहान असेल तर अख्खीच वापरावी. नाहीतर दोन तुकडे करावे. 
  • कढईत ३ टेबलस्पूनतेल गरम करावे. त्यात चिरलेली भेंडी मिडीयम हाय फ्लेमवर ब्राउन होईस्तोवर तळावी. याला साधारण ७-८ मिनिटे लागतात. कमी तेलात तळत असल्याने भेंडी कालथ्याने सतत परतत राहा. भेंडी तळल्यावर एका प्लेटमध्ये काढून घ्या. (किंवा घाई असेल तर भेंडी जास्त तेलात सरळ डीप फ्राय करून घ्या. पण मग फोडणीसाठी फक्त १ टेबल्स्पून तेल वापरा.) 
  • त्याच उरलेल्या तेलात मोहोरी, मेथीदाणे, हिंग, हळद, कढीपत्ता घालून फोडणी करा त्यात वाटलेला मसाला घाला आणि मोठ्या आचेवर परता. मिश्रण बऱ्यापैकी कोरडे झाले आणि थोडे तेल सुटायला लागले कि त्यात पाणी घाला. पाणी घालून आवश्यक तेवढे पातळ करा. आमटीत मीठ व  कोथिंबीर घाला.
  • आमटीला उकळी फुटली कि तळलेल्या भेंडी घालाव्यात आणि २-३ मिनिटे उकळू द्यावे. गॅस बंद करून आमटीवर झाकण ठेवा. ५ मिनिटे आमटी मुरू द्या आणि लगेच वाफाळत्या भाताबरोबर सर्व्ह करा.