Wednesday, August 10, 2016

Jayfalache Lonache (जायफळाचे लोणचे)

आमच्याकडे चौल-अलिबाग व मुरुड भागात खूप जायफळ पिकतात. हि जायफळाची फळे चवीला खूप आंबट असतात. त्यामुळे आमच्याकडे त्याचे लोणचे करण्याची पद्धत आहे. जायफळाची गोडसर चव लोणच्यात अजिबात जाणवत नाही. मुरल्यानंतरही साल थोडीशी कडक राहते.
जायफळाची फळे मधोमध कापून घेतली असता त्यातून बी निघते. बी वरील लाल आवरण म्हणजे जायपत्री. बीचे काळे कडक आवरण फोडले असता त्यातून जायफळ निघते. हि जी पांढरट फळे दिसत आहेत त्यापासूनच मुरंबा आणि लोणचे बनवतात. पावसाळ्यात हि फळे येऊन लागतात. काही ठिकाणी त्याचे सरबतही बनवतात.साहित्य:
 • जायफळाची फळे  - १२
 • घरगुती किंवा तयार लोणचे मसाला- १०० ग्रॅम  ( मी केप्रचा कैरी लोणचे मसाला वापरला)
 • हळद- १ टीस्पून 
 • हिंग- १/२  टीस्पून 
 • तेल- अंदाजे १ कप (२ वाट्या)
 • मीठ- ५  टीस्पून किंवा चवीनुसार 
कृती:
 • जायफळ धुवून आणि कोरडी करून घ्यावीत. मध्ये चीर देऊन त्यातील आतील बी व जायपत्री काढावी. बाहेरील फळाच्या भागाचे तुकडे करू घ्यावेत.  
 • जायफळाच्या तुकडयांना मीठ व हळद लावून रात्रभर ठेवा. शक्यतो चिनी मातीचे  किंवा काचेचे किंवा प्लास्टिकचे  वाडगे/बरणी वापरा. 
 • सकाळी त्याला जे थोडेसे पाणी सुटते, ते पूर्णपणे काढून टाका. सुती  कपड्यावर पसरवून  थोड्या वेळासाठी पंख्याखाली ठेवा.  
 • नंतर जायफळाचे तुकडे आणि मसाला एकत्र करा.   
 • तेल वाफ/धूर येईपर्यंत गरम करावे. गॅस बंद करून तेल जरा थंड झाल्यावरत्यात हिंग घालून फोडणी तयार करावी. जळवून देऊ नये. तेल थंड झाल्यावर ही फोडणी लोणच्यावर घालून निट मिक्स करावे. 
 • स्वच्छ, सुक्या व हवाबंद काचेच्या बरणीत भरून ठेवावे. लोणचे बरणीत भरल्यावर वर तेलाचा थर हवा नाहीतर बुरशी येते. (तेल कमी पडल्यास तेल वाढवावे. कच्चे तेल लोणच्यात कधीही घालू नये. तेल गरम करून थंड झाल्यावरच लोणच्यात टाकावे.) अंदाजे १० ते १५ दिवसात लोणचे मुरते.
  लोणचे मुरल्यावर फ्रिझमध्ये ठेवलेत तर जास्त काळ टिकेल.