Tuesday, March 29, 2016

Olya Kajuchi Bhaji/Usal (ओल्या काजूंची भाजी किंवा उसळ)

मार्च सुरु झाला की कोकणात ओले काजू यायला लागतात. आदिवासी बायका हे ओले काजू विकायला आणतात. ते खरेदी करायला खव्वयांची एकच झुंबड उडते. आमच्या घरात ओले काजूगर म्हणजे जीव की प्राण. पण काजू सोलताना त्याच्या चिकानं हाताची साले निघतात. पण चव इतकी अप्रतिम की हाताची साले गेली तरी बेहत्तर……….
ओल्या काजूंची भाजी किंवा उसळ करायच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. ब्राम्हणी पद्धतीची उसळ आंबट-गोड अशी असते. माझी आहे हि मालवणी पद्धत.



Read this recipe in English........... click here. 


साहित्य:
  • ओले काजू, सोललेले - २ कप 
  • बटाटा- १ मध्यम (ऐच्छिक, भाजी पुरेशी होण्यासाठी घालावा.)   
  • कांदा,  चिरून- १ मध्यम 
  • भाजलेल्या खोबऱ्याचे वाटण- २ टेबलस्पून  
  • आले लसूण वाटण- २ टीस्पून 
  • हळद- १/२ टीस्पून 
  • हिंग- १/४  टीस्पून
  • मालवणी मसाला किंव्हा घरगुती मसाला- ३ टीस्पून
  • गरम मसाला- १ टीस्पून (ऐच्छिक)
  • मीठ- चवीनुसार 
  • तेल- ३ ते ४ टेबलस्पून 
  • कोथिंबीर, बारीक चिरून- मूठभर 

 कृती:
  • काजू व्यवस्थित सोलून घ्यावेत. काजू सोलताना हाताला तेल चोळावे. नाहीतर हात फार खाजतात आणि काळे होतात. ओले काजु थोडा वेळ पाण्यात भिजत घालावेत, म्हणजे सालं सहज निघून येतील. सालं काढल्यावर काजू पाण्यात स्वच्छ धुऊन घ्यावेत.
  • बटाटे सोलून साधारण १ इंचाचे तुकडे करावेत. 
  • एका कढईत तेल गरम करून कांदा तपकिरी रंगावर परतून घ्यावा. 
  • त्यात हिंग, हळद आणि मसाला टाकून काही  वेळ परतावा. 
  • त्यात आले-लसूण पेस्ट टाकून जरास परतावं. 
  • त्यात काजू, बटाट्याचे तुकडे टाकून थोडस पाणी टाकून व्यवस्थित मिसळून मंद आचेवर ५-६ मिनिटे झाकण ठेऊन शिजवावे. 
  • त्यात गरम मसाला आणि मीठ टाकून  छान एकत्र करून पुन्हा एक वाफ काढावी. 
  • नंतर त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून झाकण ठेऊन काजू, बटाटा शिजेपर्यंत शिजू द्यावे. 
  • कोथिंबीर टाकून भांडे उतरावे. 
  • चपाती किंवा भाकरी सोबत गरमागरम खायला द्यावे.

टिप:
  • तुम्ही तुमचा स्वतःचा घरगुती मसाला वापरू शकता. 
  • मालवणी किंव्हा घरगुती मसाला नसेल तर (१ टीस्पून मिरची पूड + २ टीस्पून गरम मसाला किंव्हा गोड मसाला) असे वापरा. 
  •  काजू आकाराने मोठे असले तर शिजायला वेळ लागतो. अर्धवट शिजलेले ओले काजू  अजिबात चांगले नाहीत.  
  • सालं काढून काजू फ़्रीजर मध्ये ठेवले तर महिनाभर चांगले रहातात. 
  • ओले काजु उपलब्ध नसतील तर न खारवलेले, सुके काजू दोन तास पाण्यात भिजत घालून वापरावेत. अर्थात ओल्या काजूंचा स्वाद त्याला नाही येत.
  • या भाजीत उकडलेले अंड खूप छान लागते. भाजी शिजली कि उकडलेल्या अंड्याचे चार तुकडे करून भाजीत वरून अलगद घालावेत. 

No comments:

Post a Comment

आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास उत्साह मिळतो. आपला अभिप्राय, सुचना आम्हाला ज़रूर कळवा. आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच कायम राहो.