Wednesday, January 28, 2015

Kolambi Aani Kanda Patichi Bhaji (कोळंबी आणि पातीचा कांदा भाजी )



Read this recipe in English......click here.

साहित्य:
  • सोललेली कोळंबी लहान -  १/२  ते  ३/४ कप 
  • पातीचा कांदा, चिरलेला - १ जुडी (साधारण १ किंवा १+१/४ कप)
  • बारीक चिरलेला कांदा- १/४  कप (ऐच्छिक) 
  • लसूण, ठेचून- ६ पाकळ्या
  • मालवणी मसाला किंवा घरगुती मसाला - २ ते ३ टिस्पून 
  • हळद- १/२ टिस्पून
  • हिंग- १/४ टिस्पून 
  • कोकम/आमसुलं- ३ (किंव्हा १/२ कप टोमॅटो)
  • तेल- ४ टेबलस्पून
  • मीठ- चवीनुसार 


कृती:
  • कोळंबी सोला आणि आतील दोरा काढा. व्यवस्थित धुवा आणि १/२ टिस्पून मीठ आणि १/४ टिस्पून हळद लाऊन मुरत ठेवा.  
  • एका पॅनमध्ये तेल गरम करून व कांदा आणि लसूण परतावे. हळद, हिंग टाकून एक मिनिट परतावे.
  • मसाला आणि कोळंबी घालून छान परतून घ्यावी.
  • चिरलेला पातीचा कांदा आणि मीठ घालावे. आणि नीट एकत्र करून परतून घ्यावे. 
  • झाकण ठेवुन भाजी मंद आचेवर साधारण ५ मिनिटे शिजवावी. भाजीला पाणी सुटते.   
  • कोकम घालून जरा वेळ परतावी. म्हणजे पाणी पण सुकेल. 
  • तयार भाजी भाकरी किंवा आमटी भाताबरोबर सर्व्ह करावी.


टीपा:
  • मी आणलेल्या पातीचे कांदे छोटे आणि कवळे होते, त्यामुळे मी थोडा कांदा वापरला आणि हिरव्या पातीसोबतच पांढरा भाग शिजायला टाकला. 
  • जर पातीचे कांदे मोठे आणि जून असतील तर दुसरा कांदा न वापरता लसणासोबतच चिरून फोडणीला घालावेत. 
  • कोलंबीच्या ऐवजी सोडे किंव्हा सुकट वापरली तरी मस्त चव येते.       


Friday, January 23, 2015

Khava Modak (खव्याचे मोदक)

आज गणेश जयंती निमित्त बाप्पाला नैवेद्य ……


साहित्य :

  • खवा/मावा - १ कप 
  • बारीक साखर- १/२ ते ३/४ कप 
  • वेलची पूड- १/२ टीस्पुन 
  • साजूक तूप- मोदकाच्या मोल्डला लावण्यासाठी  

कृती :
  • खवा मळून घेवून त्यात साखर मिसळावी .
  • जाड बुडाचे पातेले किंव्हा नॉन-स्टिक प्यान घेवून त्यात खवा घालून मंद गॅस वर ढवळत राहावे. साखर पूर्ण विरघळेल आणि खवा पातळ होऊ लागेल.  
  • मधून मधून गोळी होत आली का पहावी, गोळी करताना मावा बोटाला चिकटता कामा नये. गोळी झाली कि गॅस बंद करून पातेले खाली उतरावे. 
  • वेलची पूड घालावी व नीट मिक्स करावे.  
  • मावा थंड होवू दयावा.
  • छोटे मोदकाचे मोल्ड बाजारात मिळतात. त्यात थोडेसे तूप लावून खवा दाबून भरावा. 
  • अश्या प्रकारे सर्व मोदक करून घ्यावेत.    

Tuesday, January 20, 2015

Kothimbir Vadi (कोथिंबीर वडी)

खुसखुशीत आणि रुचकर, लहान-थोर सगळ्यांना आवडणारी कोथिंबीर वडी !




Read this recipe in English........click here.

साहित्य:
  • कोथिंबीर, कापुन- १ मोठी जुडी (अंदाजे ४ कप) 
  • बेसन- २ १/४ कप 
  • तांदळाचे पीठ- १ टेबलस्पून 
  • हळद- १ टिस्पून 
  • हिंग- १/२ टिस्पून 
  • मिरची पुड- २ ते ४ टिस्पून (आवडीप्रमाणे) 
  • जिरे पुड - १/२ टेस्पून 
  • तीळ - 2 टेबलस्पून 
  • खसखस- १ टिस्पून 
  • मीठ- चवीनुसार 
  • तेल- आवश्यकतेनुसार 
  • पाणी- फार थोडे (अगदी १ टेबलस्पून) 

कृती:
  • कोथिंबीर निवडून घ्या. लहान, कोवळी देठे पण घ्या. 
  • कोथिंबीर धुवा आणि चाळणीत ठेऊन निथळून घ्या. पाणी निथळल्यावर कोथिंबीर चिरून घ्यावी. 
  • तेल आणि पाणी वगळता कोथिंबीर आणि सर्व साहित्य परातीत एकत्र करा. चांगले मिक्स करावे. 
  • १ टेबलस्पून तेल गरम करून मिश्रणात ओतावे. चमच्याने मिक्स करावे. 
  • थोडे थोडे पाणी घालावे आणि छान एकत्र मळून गोळा बनवा. 
  • त्याचे २ भाग करून लंबगोल आकाराचे गोळे/उंडे करा. 
  • भांड्याला आतून थोडे तेल लाऊन घ्या, त्यात ते गोळे ठेवा. 
  • २० मिनीटे वाफवुन घ्या. (मी मायक्रो-ओव्हन मध्ये वाफवले, साधारण ६ ते ८ मिनीटे लागतात.) 
  • वाफवून झाले कि त्या गोळ्यात सुरी किंव्हा टूथ-पिक टोचा, ती बाहेर स्वच्छ आली तर वडी शिजली आहे. 
  • थंड झाल्यावर साधारण पाव इंचाचे काप करा. 
  • वड्या सोनेरी रंगावर तळून (शालो फ्राय किंवा डीप फ्राय) घ्या. 
  • एक नाश्ता म्हणून हिरव्या चटणी आणि टोमॅटो केचपबरोबर किंवा जेवणात तोंडीलावणे म्हणुन कोथिंबीर वडी गरम सर्व्ह करावी. 

टिप:
दुसऱ्या पद्धतीने कोथिंबीर वडी करू शकतो. थाळीला तेल लाऊन त्यात कोथिंबीरीचे मिश्रण थापावे. वाफवून घेऊन थंड झाल्यावर चौकोनी वड्या पाडाव्यात.

Tuesday, January 6, 2015

Undhiyu (उंधियु)

उंधियु हिवाळ्यात केला जाणारा पारंपारिक गुजराती पदार्थ आहे. या दिवसात सर्व प्रकारच्या भाज्यांची रेलचेल असते. उंधियु म्हणजे बर्‍याच भाज्यांचे मिश्रण. उंधियुची एक खासियत म्हणजे प्रत्येक भाजीची विशिष्ट चव आपल्याला चाखता येते. कमी मसाले वापरले असल्यामुळे मसाल्याची तीव्र चव भाज्यांच्या चवीला मारत नाही तर त्यांना खुलवते. प्रत्येकाची कृति थोडीफार वेग़ळी असतेच. आमच्या शेजारच्या गुजराती काकुंकडून (सौ. भारती शहा) मी  उंधियु शिकले. मी यात थोडे बदल केले आहेत.




Read this recipe in English.......... click here.

वाढणी: ४
पूर्वतयारी:
# १   हिरवा मसाला करण्यासाठी:- 
साहित्य:
  • कोथिंबीर, चिरलेली- १/२ कप
  • लसूण-  १० पाकळ्या (हिरव्या लसणीची पात वापरली तरी चालेल)
  • हिरव्या मिरच्या- ५ ते ७ (आपल्याला झेपतील तश्या)
  • आले तुकडा- १ इंच 
  • दाण्याचा कुट - १/४  कप
  • तीळ- १  १/२  टेबलस्पून
  • ओले खोबरे, खवलेले- १  टेबलस्पून
  • साखर- १ टीस्पून 
  • लिंबू - १ 
  • मीठ - चवीनुसार 
कृती:
तीळ भाजून घ्यावेत.
लिंबाचा रस काढा.
हिरव्या मिरच्या, लसूण व आले हे एकत्र. पाणी न वापरता भरडसर ठेचावे किंव्हा वाटावे.
हा मिरची ठेचा व वर उल्लेख केलेल्या सर्व जिन्नस एकत्र करा.

# २ मेथी मुठीया  बनवण्यासाठी :-
साहित्य:
  • मेथी, चिरून- १ कप  
  • गव्हाचे पीठ /कणिक - १/२  कप (पीठ रवाळ असेल तर उत्तम)
  • बेसन - १/४  कप
  • ज्वारी किंवा तांदूळ पीठ- २ टेबलस्पून 
  • लाल मिरची पूड- १ टिस्पून
  • हळद- १/२ टिस्पून
  • धणे पूड - १/२ टिस्पून
  • हिंग- १/४  टिस्पून
  • तीळ- १ टिस्पून
  • लिंबाचा रस- अर्धा भाग लिंबापासून 
  • साखर- १  १/२ टिस्पून
  • मीठ - चवीनुसार 
  • खायचा सोडा-१/२  टिस्पून
  • तेल - १ टिस्पून
  • पाणी- १/४  कप
  • तेल तळण्यासाठी - आवश्यकतेनुसार 
कृती:
मेथी धुवून आणि कापून घ्यावी. तेल वगळता सर्व साहित्य एकत्र करा. घट्ट कणिक मळा.
तेल टाकून पुन्हा मळा. छोटे लांबट गोळे बनवुन घ्या. टूथपिकने भोके पाडा. 
मंद- मध्यम आचेवर तळा, अन्यथा ते आत कच्चट राहतील. (तळलेले नको हवे असतील तर मुठिया वाफवू शकता.)

आता मुख्य पाककृतीकडे वळू या …उंधियु
साहित्य:
  • सुरती पापडी (वाल पापडी), चिरून - १ कप
  • सुरण, छोटे तुकडे करून- १/२  कप
  • कोनफळ, छोटे तुकडे करून- १/२  कप
  • रताळे, छोटे तुकडे करून- १/२  कप
  • कच्चे केळे, तुकडे करून- १
  • लहान वांगी - २
  • छोटे बटाटे- ३ 
  • मटार - १/४  कप
  • तुरीचे दाणे - १/४ कप 
  • हळद- १ टिस्पून 
  • हिंग- १/२ टिस्पून
  • रजवाडी गरम मसाला- २ ते ३ टिस्पून 
  • ओवा- १/२ टिस्पून
  • तेल- ६ टेबलस्पून (मुठिया तळण्यासाठी जे तेल वापरले त्याच तेलाचा वापर करा, मेथीची चव त्यात उतरली असते) 
  • पिवळी शेव- सजावटीसाठी 
  • लिंबू- अर्धा भाग (सुरणाला चोळण्यासाठी) 


कृती:
  • सुरती पापडी धुवून घ्या, दोरे काढून तुकडे करा.
  • रताळ्याचे स्वच्छ धुवून छोटे चौकोनी तुकडे करा.
  • सुरणाची साले काढून छोटे चौकोनी तुकडे करा. (सुरण खाजरा असतो म्हणून कापताना हाताला थोडेसे तेल चोळा तसेच खाताना घश्याला खाजू नये म्हणून त्यावर मीठ व लिंबाचा रस टाकून चोळून बाजूला १५ मिनीटे ठेवा, वापरायच्या वेळेला ते तुकडे धुवून घ्या.) 
  • कोनफळाची साले काढून छोटे चौकोनी तुकडे करा.  
  • बटाट्याची साले काढून अधिक च्या आकारात चिरा मारा. 
  • वांग्याची देठे काढून अधिक च्या आकारात चिरा मारा. 
  • वांगी व बटाट्यात वर तयार केलेला हिरवा मसाला भरा.  
  • उर्वरित हिरवा मसाला सुरण, कोनफळ, रताळे, कच्चे केळे याला चोळा. 
  • हिरवा मसाला लावलेल्या ह्या भाज्या अर्धा तास मुरु द्या. 
  •  एका मोठ्या कढईत किंवा हंडी मध्ये तेल गरम करावे. 
  • ओवा, हिंग, हळद याची फोडणी करावी. त्यात बटाटे आणि वांगी टाकावी. परतून घ्यावे आणि थोडे पाणी शिंपडावे. झाकण ठेऊन मध्यम गॅसवर ४-५ मिनीटे शिजू द्यावे.
  • केळी, सुरण, रताळे आणि कोनफळ चे तुकडे मसाल्यासकट टाकून परतावे. परतून आणि झाकण ठेऊन मंद गॅसवर ४-५ मिनीटे शिजू द्यावे.
  • सुरती पापडी, मटार, तुरीचे दाणे  आणि रजवाडी गरम मसाला टाकावा. छान एकत्र  करून परतून घ्यावे. 
  • थोडे पाणी शिंपडावे.   झाकण ठेऊन मंद गॅसवर ८-१० मिनीटे शिजू द्यावे. मधेमधे हलवत रहावे अन्यथा खालून करपेल. गरज असेल तसे थोडे-थोडे पाणी शिंपडावे.
  • भाज्या शिजल्या की  त्यात मुठीया घालाव्यात. हलक्या हाताने मिक्स करून झाकण ठेऊन मंद गॅसवर ४-५ मिनीटे शिजू द्यावे.
  • वाढताना वरून शेव भुरभुरावी.  
  • गरमगरम  नाश्ता म्हणून नुसतेच किंवा चपाती/ पराठा सोबत भाजी म्हणून करावे.

टिपा:
  • अजुन तिखट करायचे असेल तर १ टीस्पून मिरची पावडर गरम मासाल्यासोबत भाजीत टाकावी. 
  • गुजराती लोक उंधियुमध्ये जरा जास्तच तेल वापरतात. पण मी जास्त तेल वापरलेले नाही.   
  • आवडत असल्यास गाजर, वाल, ओले हरभरे, शेवगाच्या शेंगा इत्यादी भाज्या वापरू शकता.  

उंधियु करण्यासाठी कामांचा क्रम :
  1. मेथी निवडा.
  2. सुरण सोलुन, कापुन त्यावर मीठ आणि लिंबाचा रस चोळा.
  3. मटार आणि तुरीच्या शेंगा सोला. वाल पापडी मोडून घ्या.  
  4. इतर सर्व भाज्या कापा.  
  5. हिरवा  मसाला तयार करून भाज्यांना लावा. 
  6. मुठीया तयार करून तळुन ठेवा.   
  7. आता मुख्य उंधियु करायला सुरुवात करा.  
हे कार्य नियोजन तुम्हाला घाईच्या वेळेला उपयुक्त ठरेल, अशी आशा आहे. :)

Monday, January 5, 2015

Turichya Danynchi Usal (तुरीच्या दाण्यांची उसळ)

सोप्पी, साधी आणि चवीला अतिशय रुचकर….

Read this recipe in English.......click here.

साहित्य:
  • तुरीचे दाणे - १ १/२ कप (५०० ग्रॅम तुरीच्या शेंगापासून)
  • टोमॅटो, बारीक चिरून- १ मध्यम
  • मोहरी- १ टिस्पून
  • जिरे - १/२ टिस्पून
  • हळद - १/२ टिस्पून
  • हिंग- एक चिमूटभर
  • कोल्हापुरी चटणी मसाला/कांदा-लसुण मसाला- 2 ते 3 टिस्पून
  • तेल - 3 टेबलस्पून
  • कोथिंबीर - एक मूठभर
  • ओले खोबरे, खवुन- २ टिस्पून
  • मीठ - चवीनुसार

कृती:
  • पॅन मध्ये तेल गरम करावे. मोहरी, जिरे, हळद आणि हिंग घालून फोडणी करावी.
  • त्यात तुरीचे दाणे घालावेत. लगेच पॅनवर झाकण ठेवा कारण दाणे फोडणीत टाकल्यावर उडू लागतात. मंद आचेवर २-३ मिनिटे शिजू द्यावे.
  • नंतर टोमॅटो, कोल्हापुरी मसाला, मीठ घालून चांगले मिक्स करावे.
  • थोडे पाणी शिंपडा आणि खोबरे आणि कोथिंबीर घालून मिक्स करावे.
  • झाकण ठेऊन मंद आचेवर ५ मिनिटे शिजू द्यावे. उसळ तयार आहे.
  • पोळी किंवा भाकरी सोबत हि चवदार उसळ सर्व्ह करावी.
  • किंवा ... प्लेट मध्ये थोडीशी उसळ घेऊन त्यावर चिरलेला टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, लिंबाचा रस आणि शेव टाका. एक नाश्ता म्हणून सर्व्ह करता येईल.
टिपा:
  • कोल्हापुरी मसाला ऐवजी ( 1½ टीस्पून तिखट + 1½ टीस्पून गोडा मसाला) वापरू शकता.
  • फोडणीत हवा असल्यास चिरलेला कांदा घालू शकता.
  • मटार, ओला हरभरा, वाल/पावटा दाणे वापरून अश्या प्रकारची उसळ करू शकता.

Friday, January 2, 2015

Veggie Mayonnaise Sandwich (मेयोनिझ व्हेजी सँडविच)

झटपट होणारे रुचकर सँडविच

Read this recipe in English........ click here.

साहित्य:
  • ब्रेड स्लाईस - १ पॅकेट (आपण ब्राऊन ब्रेड वापरू शकता)
  • बटर/लोणी - आवश्यकतेनुसार 
सारण:
  • बटाटे, उकडडून सोललेले - 2 मध्यम 
  • स्वीट कॉर्नचे दाणे, उकडलेले - १/२  कप
  • गाजर, किसुन  किंवा बारीक चिरून - १/२  कप
  • कांदा, चिरून- १/२  कप
  • सिमला मिरची, चिरून- १/२  कप
  • आइसबर्ग लेट्युस किंव्हा ताजा छोटा कोबी, चिरून- १ कप
  • लसूण, बारीक चिरून- १ टेस्पून
  • ऑलिव्ह तेल- १ टिस्पून (ऐच्छिक)
  • मिरपूड - 2 टिस्पून किंवा आपल्या आवडीनुसार 
  • एगलेस मेयोनिझ - ६ टेबलस्पून किंवा आपल्या आवडीनुसार 
  • मीठ- चवीनुसार 

कृती:
  • एका वाडग्यामध्ये सारणाचे सर्व साहित्य एकत्र करा आणि चांगले मिक्स करा.
  • दोन ब्रेड स्लाईसच्या मध्ये सारण भरून नोंस्तिक तव्यावर बटर सोडून खरपूस भाजा. किंव्हा सँडविच मेकर वापरा.
  • टोमॅटो केचपबरोबर गरमागरम सर्व्ह करावे.


टीपा: 
  • सँडविच टोस्ट केले (भाजले) नाही तरी चालेल, असे देखील चांगले लागते.
  • आपण आपल्या वैयक्तिक आवडीनुसार इतर भाज्या घालु शकता किंव्हा वगळु शकता. भाज्या प्रमाण देखील लवचिक आहे.
  • आइसबर्ग लेट्युस हा सहज उपलब्ध नाही. त्यामुळे कोबी वापरू शकता, चवीत फारसा फरक पडत नाही. 
  • तिखट आवडत असेल तर चिली फ्लेक्स टाकु शकता.