Wednesday, July 15, 2015

Kolambiche Lipate (कोळंबीचे लिपते)

कोळंबीचे लिपते म्हणजे अंगाबरोबर रस असलेले कालवण जे चपाती किंवा भाकरीसोबत खाता येईल.Read this recipe in English.....click here.

साहित्य:
 • कोळंबी, सोललेली- १/२  ते  ३/४  कप
 • कांदा, बारीक चिरून- २ मध्यम  (साधारण १ कप)
 • टोमॅटो, बारीक चिरून- २ (साधारण १ कप)
 • हिरव्या मिरच्या- २
 • हळद- १/२ टिस्पून
 • हिंग- १/४ टीस्पून
 • घरगुती मिक्स मसाला किंवा मालवणी मसाला किंवा सनडे मसाला- २ टिस्पून
 • आले~लसूण पेस्ट- २  टेबलस्पून
 • कोकम / आमसुल- २ 
 • तेल- ४  टेबलस्पून
 • मीठ- चवीनुसार 
 • कोथिंबीर, बारीक चिरून- एक मूठभर


कृती:
 • कोळंबी सोलून, मधला दोर काढून स्वच्छ धुवून घ्यावी. (मी इथे मध्यम आकाराची  कोळंबी वापरली आहे परंतु लहान कोळंबी अधिक चविष्ट लागते.
 • कोळंबीला मीठ, हळद, मसाला आणि आले-लसूण पेस्ट लावून  किमान अर्धा तास मुरत ठेवावे.
 • कढईत तेल गरम करून कांदा घाला. कांदा गुलाबी होईपर्यंत परतल्यावर त्यात हिंग घालून जरासं परता. 
 • त्यात मिरची, टोमॅटो आणि थोडे मीठ घालावे. मिरच्या देठ काढून अख्ख्याच घालाव्यात. छान परतून घ्यावेत. 
 • टोमॅटो परतून मऊ होतील आणि मसाल्याला तेल सुटू लागले की त्यात कोळंबी टाका आणि जरासं परता.  त्यावर थोडे पाणी शिंपडा आणि चांगले मिक्स करा.
 • कोकम आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. झाकण ठेवून ६ ते ८ मिनिटे शिजू द्यावे. मध्ये मध्ये ढवळत रहा म्हणजे खालून करपणार नाही. खूप शिजवू नका. 
 • तेल सुटू लागेल, गॅस बंद करावा. उर्वरित कोथिंबीर वरून टाकावी. 
 • भाकरी  किंवा चपाती सोबत गरम सर्व्ह करावे.

Thursday, July 9, 2015

Chahacha Masala (चहाचा मसाला)

चहा मसाल्याने चहाला छान  चव आणि वास येतो.  पावसाळ्यात किंवा थंडीत नेहमीचा चहा पिण्याऐवजी आल्याचा चहा प्यावासा वाटतो.  आल नसेल घरात तर मसाला टाकून ती तलफ भागवता येते. हा चहा खवखवणाऱ्या घशाला आणि मरगळलेल्या मनाला आराम देतो. 

 

साहित्य:
 • सुंठ- १/४ कप 
 • लवंग- २ टेबलस्पून  
 • काळी मिरी- १/४ कप 
 • दालचिनी, छोटे तुकडे करून किंवा कुटून- १/४ कप 
 • वेलची- १/४ कप 
 • जायफळ, किसुन - १ अख्ख 
 • सुकलेली तुळशीची पाने- १० (ऐच्छिक)  

कृती:
जायफळ आणि सुंठी शिवाय बाकी सगळे मसाले थोडे थोडे भाजून, थंड होऊ द्यावे. 
तुळशी पाने, सुंठ आणि जायफळ पूड त्यात घालून मिक्सर मधून काढावे. 
थंड झाल्यावर हवाबंद डब्यात हा मसाला  ठेवावा. अगदी वर्षभर छान टिकतो. 
चहाच्या एका कपाला साधारण १/४ टीस्पून एवढा घालावा.  दुधात टाकून पण छान  लागतो. (चहात किंवा दुधात टाकून उकळावा.)    


टीपा:
 • वर दिलेल्या मसाल्याच्या पदार्थांच्या तयार मिळत असलेल्या पावडर एकत्रित करून सुद्धा झटपट मसाला करता येईल. 
 • सुंठीचे प्रमाण तिखटपणा किती हवाय, यावर अवलंबून आहे. प्रमाण वाढवले तरी चालेल.  
 • औषधी गुणधर्म वाढवायचे असतील तर २ टेबलस्पून पिंपरामुळ पूड घालावी.  
 • कॉफी ग्राईंडर असेल तर उत्तम. त्यात छान दळला जातो हा मसाला. 

Wednesday, July 8, 2015

Fodashichi Bhaji (फोडशी/कुलुची भाजी)

फोडशी किंवा कुलु किंवा काल्ला या नावाने हि रानभाजी रायगड जिल्ह्यात ओळखली जाते. इतर भागात या भाजीची नावे वेगळी असू शकतात.
हि भाजी म्हणजे एक प्रकारचे गवतच असते. हि भाजी फक्त पावसाळ्यातच मिळते. इतर पावसाळी भाज्यांप्रमाणे हि चविष्ट असते. हि भाजी शाकाहारी व मांसाहारी ह्या दोन्ही प्रकारात करता येते.

Read this recipe in English.......click here.

# पध्दत १ (सुकट घालून)साहित्य:
फोडशी/कुलु - १ जुडी
सुकट /सुका जवळा- १/२ कप
चिरलेला कांदा- १ कप
ठेचलेल्या लसूण पाकळ्या - ६ ते ८
हिंग- १/४ टीस्पून
हळद- १/२ टीस्पून
घरगुती मसाला किंवा मालवणी मसाला- २ टीस्पून
कोकम/आमसूल- ३
मीठ चवीनुसार
तेल- ३ टेबलस्पून

कृती:
 • सुकट  निवडून पाण्यात किमान १५ मिनिटे भिजत घाला. नंतर पाण्यातून काढून घट्ट पिळुन घ्या.  
 • भाजीच्या छोट्या जुडित आत एक कडक असा काठी सारखा भाग असतो तो काढून टाका. कधी कधी त्याला फुले/तुरे आलेले असतात, तेही काढून टाका.    
 • भरपूर पाण्यात काळजीपुर्वक स्वच्छ धुवून घ्या. मुळाजवळ आणि पानांच्या चुणेत माती असते. 
 • नंतर चिरून व धुऊन घ्या. मुळे आधीच कापलेली असतात. पांढरा भाग असती तोही चिरून घ्यावा. साधारणपणे २ कप एवढी भाजी मिळेल. 
 • एका कढईत तेल गरम करून त्यात लसुण, कांदा टाका. कांदा गुलाबी झाला कि त्यात हळद, हिंग आणि मसाला टाका. जरासे परता. 
 • त्यात भिजवून पिळुन घेतलेली सुकट टाका व जराशी परतून घ्या. 
 •  नंतर त्यात चिरलेली भाजी व मीठ टाका. व्यवस्थित एकत्र करून घ्या.
 • त्यात थोडे पाणी शिंपडा. झाकण ठेऊन मंद आचेवर १५ ते २० मिनिटे किंव्हा भाजी शिजेपर्यंत शिजू द्या. 
 • भाजी शिजत असताना थोड्या थोड्या वेळाने हलवून जरुरी प्रमाणे पाणी घाला. नाहीतर भाजी खलीन करपेल. 
 • गरमागरम भाकरी किंव्हा आमटी-भातासोबत वाढा.
.................................................................................................... ……………

# पध्दत २ (डाळ घालून)
साहित्य:
फोडशी/कुलु - १ जुडी
चणा डाळ - २ टेबलस्पून
चिरलेला कांदा- १ कप
ठेचलेला लसूण पाकळ्या - ६
राई/ मोहरी- १ टीस्पून
हिंग- १/४ टीस्पून
हळद- १/२ टीस्पून
घरगुती मसाला किंवा मालवणी मसाला - २ टीस्पून (किंव्हा मिरची पूड- १ टीस्पून+ गरम मसाला- १ टीस्पून)
मीठ चवीनुसार
तेल- ३ टेबलस्पून
खवलेले ओलं खोबरं- २ टेबलस्पून (ऐच्छिक)

कृती:
 • चणा डाळ धुवून २ तास भिजत ठेवा. 
 • भाजीच्या छोट्या जुडित आत एक कडक असा काठी सारखा भाग असतो तो काढून टाका. कधी कधी त्याला फुले/तुरे आलेले असतात, तेही काढून टाका.    
 • भरपूर पाण्यात स्वच्छ धुवून घ्या. मुळाजवळ माती असते. 
 • नंतर चिरून व धुऊन घ्या. मुळे आधीच कापलेली असतात. पांढरा भाग असती तोही चिरून घ्यावा. साधारणपणे २ कप एवढी भाजी मिळेल. 
 • एका कढईत तेल गरम करून मोहरी टाका, मोहरी तडतडली कि लसुण, कांदा टाका. कांदा गुलाबी झाला कि त्यात हळद, हिंग आणि मसाला टाका. जरासे परता. 
 • त्यात भिजलेली डाळ व थोडे पाणी टाका. झाकण ठेऊन मंद आचेवर ५-७ मिनिटे शिजू द्या. 
 • नंतर त्यात चिरलेली भाजी व मीठ टाका. व्यवस्थित एकत्र करून घ्या.
 • त्यात थोडे पाणी शिंपडा. झाकण ठेऊन मंद आचेवर १५ ते २० मिनिटे किंव्हा भाजी शिजेपर्यंत शिजू द्या. 
 • भाजी शिजत असताना थोड्या थोड्या वेळाने हलवून जरुरी प्रमाणे पाणी घाला. नाहीतर भाजी खलीन करपेल. 
 • वरून ओलं खोबरं पेरा. गरमागरम भाकरी किंव्हा चपाती किंव्हा आमटी-भातासोबत वाढा.

टिपा:
 • हि भाजी पातीच्या कांद्याप्रमाणे दिसते. पतीचा कांदा फार लवकर शिजतो पण ह्या भाजीला शिजायला जास्त वेळ लागतो.
 • तुम्ही वरील पद्धतीने सुकट घालुन पातीच्या कांद्याची भाजी करू शकता.
 • हि भाजी किंचित कडू असते पण अगदी मेथी इतकी कडू नसते.
 • या भाजीच्या पानांची भजी पण करता येते. पालक किंवा मेथीची गोळा भजी करतो तशी.