Tuesday, May 5, 2015

Kokam Sarbat/ Amrut Kokam (कोकम सरबत/अमृत कोकम)

कोकम सरबत हे आंबट-गोड चवीचे अतिशय रुचकर, पाचक, आम्लपित्तनाशक असे गुणकारी पेय आहे. उन्हाळ्यातच नाही तर संपुर्ण वर्षभर प्यायले जाणारे महाराष्ट्रातील अतिशय लोकप्रिय पेय आहे. कोकमाची फळे "रातांबे" या नावाने सुद्धा ओळखली जातात. कोकणात एप्रिल-मे मध्ये मुबलक प्रमाणात येऊ लागतात. याची साले सुकवुन जेवणात आंबटपणासाठी वापरली जातात. त्यालाच कोकम, आमसुलं किंव्हा सोलं अस म्हटलं जात. याचा सरबतासाठी लागणारा गोड पाक/सिरप कसा बनवायचा ते पाहू या….


Read this recipe in English......click here.

कोकम पाक/सिरप बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
कोकम फळे- ३०
साखर- १  १/२ कप
कृती:
कोकम फळे धुवून फडक्याने पुसून कोरडी करा. कोकम फळाचे दोन भाग करून आतला पांढरा गर काढा.
कोकमाच्या वाटीत साखर भरा. स्वच्छ, कोरडी बरणी घ्या आणि तळाशी थोडी साखर पसरवा. एकावर एक अशा त्या कोकमाच्या वाट्या ठेवा. वरून पुन्हा थोडी साखर टाका. 
बरणीच्या तोंडाला सुती कापड बांधा आणि ८-१० दिवस कडक उन्हात ठेवा. उन्हात ठेवण्यापूर्वी दररोज नीट ढवळून घ्यावे.
८-१० दिवसांत छान घट्ट, गडद गुलाबी-लालसर रंगाचा पाक तयार होईल. 
साले घट्ट पिळून काढा आणि गाळून घ्या. 
स्वच्छ, कोरड्या, हवाबंद बाटली मध्ये हा पाक भरून ठेवा. व्यवस्थित काळजी घेतली तर वर्षभर टिकतो.  

टीप:
रस काढलेल्या सालांचा काही उपयोग नसतो. माझ्या लहानपणी, माझी आई काही सालाना पुन्हा थोडी साखर लावून ती वाळवत असे. आम्ही खायचो पण खूप आंबट लागायची आणि आमची नखे ​​व दात पिवळे धम्मक व्हायचे खावून झाल्यावर. आजही आठवल कि हसू येत.

कोकम सरबत बनवण्यासाठी लागणारे साहित्य साहित्य: (१ ग्लास साठी)
  • कोकम सिरप- १ टेबलस्पून
  • थंड पाणी- साधारण २०० मिली (म्हणजे एका ग्लासात राहील इतके)
  • शेंदेलोण/सैंधव मीठ किंवा पादेलोण किंवा साधे मीठ- लहान चिमूटभर
  • भाजलेल्या जीऱ्याची पूड- १/४  टिस्पून किंवा चवीनुसार
  • पिठीसाखर- आवश्यकतेनुसार (गरज असल्यास, कोकमांच्या आंबटपणावर अवलंबून आहे.)
  • पुदिना पाने- सजावटीसाठी (ऐच्छिक)
  • बर्फाचे तुकडे किंवा चुरा- आवश्यकतेनुसार 

कृती:
एका काचेच्या ग्लासमध्ये कोकम सिरप, थंड पाणी, मीठ, जिरेपूड, पिठीसाखर घालून चांगले मिक्स करावे.
पुदीना पाने तोडून घालावी. बर्फाचे तुकडे घातले की सरबत पिण्यास तयार.

1 comment:

  1. Excellent. It reminds me of my childhood in India. Thanks.

    ReplyDelete

आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास उत्साह मिळतो. आपला अभिप्राय, सुचना आम्हाला ज़रूर कळवा. आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच कायम राहो.