Tuesday, April 21, 2015

Methamba (मेथांबा)

झटपट होणारे आंबट-गोड, तिखट लोणचे. मोहरी आणि मेथीच्या फोडणीचा खमंगपणामुळे लोणचे मस्त चटकदार होते.


Read this recipe in English....click here.

साहित्य:
 • कैऱ्या - २ मध्यम 
 • गुळ, चिरून- १/२  कप (कैरीच्या आंबटपणा नुसार गुळाचे प्रमाण कमीजास्त करावे.)
 • मेथीचे दाणे- १/२  टिस्पून
 • तेल- १ टेबलस्पून
 • मोहरी- १/४  टिस्पून
 • हिंग- १/४  टिस्पून
 • हळद- १/४  टिस्पून
 • लाल तिखट/मिरची पूड- १ टिस्पून किंवा चवीनुसार
 • मीठ - १/२  टिस्पून किंवा चवीनुसार
 • पाणी-१/२  कप


कृती:
 • कैऱ्या धुवा आणि फडक्याने पुसून कोरड्या करा. 
 • कैऱ्या सोला व बाटे/कोय काढून टाका. छोटे छोटे चौकोनी तुकडे करा.
 • पॅन मध्ये तेल गरम करून मोहरी टाका. 
 • मोहरी तडतडली की हिंग, हळद आणि मेथी दाणे घालून किंचित तपकिरी होईपर्यंत परता. 
 • कैरीचे चौकोनी तुकडे आणि मिरची पावडर घाला. अगदी थोडा वेळ परता.  
 • आता पाणी आणि मीठ घालावे.  छान एकत्र करा. 
 • झाकण ठेवून कैरीचे तुकडे मंद आचेवर शिजू द्यावे.
 • तुकडे शिजले की पॅनमध्ये कडेला करून मध्ये गूळ घाला. चमच्याने गुळ दाबून रसात मिक्स करा. आवश्यक असेल तर थोडे पाणी घालावे. (रसाचे प्रमाण आपल्या पसंतीनुसार कमीजास्त ठेवावे.)
 • चांगले मिक्स करावे आणि झाकण न ठेवता मंद आचेवर ५-६ मिनीटे शिजू द्यावे. रस पाकाप्रमाणे थोडा घट्ट आणि चिकट झाला पाहिजे. थंड झाल्यावर तो अधिक घट्ट होईल. 
 • मेथांबा आता तयार आहे. चपाती किंवा पराठा बरोबर मस्त लागतो. फ्रीझमध्ये ठेवल्याने जास्त दिवस टिकेल.

Friday, April 10, 2015

Karvand Lonche (करवंद लोणचे)

बाजारात काजू, कैरी, करवंद यायला लागली कि समजावे उन्हाळा आला. आधी कच्ची करवंदे विकायला येतात आणि नंतर काळी गोड अशी पिकलेली करवंदे.  कच्ची करवंदे चटणी आणि लोणचे बनवण्यासाठी वापरली जातात.
चला तर आज करू मस्त लोणचे .........
साहित्य:
 • कच्ची करवंदे - २ कप
 • तयार कैरी लोणचे मसाला-  १२ ते १५ टिस्पून 
 • मीठ- ५ टिस्पून किंवा चवीनुसार
 • हळद- १/२  टिस्पून
 • हिंग- १/२ टिस्पून
 • तेल- १० ते १२  टेबलस्पून 

कृती:
 • करवंदांची देठे काढून टाका आणि स्वच्छ धुवा.
 • चाळणीत थोडा वेळ निथळू द्या, नंतर फडक्याने पुसून कोरडी  करा.
 • एक-एक करवंद घेऊन हळूच ठेचा. (करवंद फक्त फुटले पाहिजे, चेंदा-मेंदा करू नका.)      
 • ठेचलेली करवंदे  काचेच्या किंवा प्लॅस्टिकच्या वाडग्यात घेऊन त्यांना ४ टीस्पून मीठ चोळा व रात्रभर तशीच झाकून ठेवा. (यामुळे करवंदांचा चीक जाईल आणि ती मऊ पण होतील.)  
 • दुसऱ्या दिवशी करवंदे दाबुन त्यांच्या आतील बिया बाहेर काढा. एखाद-दुसरी बी राहिली तरी काही हरकत नाही, खाताना काढता येते. (तुम्हाला हे काम किचकट वाटत असेल तर ठेचण्याऐवजी करवंदाचे दोन भाग करून आतील बिया काढा. मीठ लाऊन रात्रभर झाकून ठेवा.)
 • करवंदांना जर सकाळी पाणी सुटले असेल तर ते काढून टाका. हलक्या हाताने दाबलीत तरी चालतील.)
 • आता त्यात लोणचे मसाला, हळद आणि १ टिस्पून मिठ घालावे. चांगले मिक्स करावे.
 • तेल वाफ/धूर येईपर्यंत गरम करावे. गॅस बंद करून तेल जरा थंड झाल्यावर त्यात हिंग घालून फोडणी तयार करावी. जळवून देऊ नये. तेल थंड झाल्यावर ही फोडणी वाडग्यात घालून निट मिक्स करावे. 
 • स्वच्छ, सुक्या व हवाबंद काचेच्या बरणीत भरून ठेवावे. लोणचे बरणीत भरल्यावर वर तेलाचा थर हवा नाहीतर बुरशी येते. (तेल कमी पडल्यास तेल वाढवावे. कच्चे तेल लोणच्यात कधीही घालू नये. तेल गरम करून थंड झाल्यावरच लोणच्यात टाकावे.) अंदाजे ८ ते १० दिवसात लोणचे मुरते. 
 • लोणचे मुरल्यावर फ्रिझमध्ये ठेवलेत तर जास्त काळ टिकेल. नको असल्यास वरचे तेल काढून टाका. (हे तेल आचारी प्रकारच्या भाज्या/पदार्थ बनवण्यासाठी वापरू शकता.)    

Wednesday, April 1, 2015

Panhe (पन्हे)

वसंत ऋतूच्या आगमनाची नांदी गुढी पाडवा आला की होते. वसंतपालवीच्या या दिवसात उन्हाळाही वाढू लागतो. हा उन्हाळा शांत करण्यासाठी चैत्रपेय म्हणून ओळखले जाणारे पन्हे पिण्याची सर्वांना ओढ लागते. कैरीची/आंबा डाळ व पन्हे यांचा नैवेद्य चैत्रागौरीला दाखवला जातो. आंबा डाळ मला फारशी आवडत नाही पण गारेगार पन्हे मला फार आवडते. 
Read this recipe in English..........click here.

साहित्य:
 • कैऱ्या- ३ मध्यम आकाराच्या 
 • गुळ- २५० ग्रॅम (गुळाचे प्रमाण कैरीच्या आंबटपणावर अवलंबून असते, त्यामुळे गुळ कमी-अधिक लागू शकतो.) 
 • वेलची पूड- १ टिस्पून
 • मीठ - चिमुटभर 
 • पाणी- आवश्यकतेनुसार 

कृती:
 • कैऱ्या स्वच्छ धुवून देठाजवळील भाग गोल कापून काढून टाका. (देठाजवळ चीक असतो, जर तो खाल्ला गेला तर घसा खाजतो.)
 • कैऱ्या थोड्या पाण्यात घालुन सुमारे १०-१५ मिनिटे उकडा. कुकरला उकडल्या तरी चालतील. 
 • थंड झाल्यावर साले आतील कोय/बी काढून टाका. सालाला चिकटलेला गर सुद्धा चमच्याने काढा.
 • गुळ चिरून घ्यावा.  
 • कैरीचा गर, गूळ किंवा साखर, वेलची पूड आणि मीठ एकत्र करून हे मिश्रण रवीने घोटू शकता किंव्हा ब्लेंडरमध्ये वाटुन घ्या. (हे मिश्रण जास्त दिवस साठवायचे असेल तर हवाबंद डब्यात भरून फ्रिझरमध्ये ठेवा. ३-४ महिने तरी अगदी उत्तम राहील. जसे हवे तसे बाहेर काढून वापरावे.) 
 • मिश्रणात हव्या त्या प्रमाणात पाणी घालून ब्लेंडरमध्ये घुसळा. (हॅण्ड ब्लेंडरने तर अगदी सोयीचे होते.) फ्रिजमध्ये  ४-५ दिवस अगदी छान राहते अर्थात उरले तर ! 
 •  सर्व्ह करायचे असेल तेव्हा बर्फाचे तुकडे घालावे आणि गारेगार पन्हे गट्टम करावे.  

टिपा:
 • मी केलेल्या पन्ह्याला आलेला रंग हा नैसर्गिक आहे. गुळ मस्त पिवळा धम्मक होता.  कुठलाही रंग अथवा केशर वापरलेले नाही.   
 • गुळ  उपलब्ध नसेल किंवा आवडत नसेल तर २५० ग्रॅम गुळाऎवजी २ कप साखर वापरावी. 
 • पारंपारिक पद्धतीप्रमाणे गुळ वापरतात. गुळ वापरल्याने पन्ह्याला चांगली चव आणि चांगला रंग येतो. गुळ वापरणे केंव्हाही साखरेपेक्षा चांगले कारण त्यात लोह, पोटॅशियम इ. पोषक खनिज असतात. 
 • खरतरं मी रसायन विरहित/नैसर्गिक गुळ नेहमी वापरते. तो गुळ काळपट तपकिरी रंगाचा असतो त्यामुळे पन्ह्याला पण तसाच  तपकिरी रंग येतो. फक्त छान सोनेरी रंग फोटोत दिसावा म्हणून मी येथे नेहमीचा पिवळा गूळ वापरला आहे. 
 • घरातला गुळ संपला आणि पन्ह्यात आंबटपणा अजून आहे तर मग साखर घालायला काहीच हरकत नाही.   
 • एकाच वेळी संपूर्ण गूळ किंवा साखर पन्ह्यात घालू नये. चव घेऊन त्यानुसार गूळ किंवा साखर वाढवावी. 
 • साखर आणि गूळ हे अर्धे-अर्धे प्रमाणात वापरू शकता.
 • पन्हे हे घट्ट असावे, फार पातळ चांगले लागत नाही. अर्थात आवड तुमची आहे.