Tuesday, December 16, 2014

Methi Ladu (मेथीचे लाडू)

आम्ही प्रत्येक हिवाळ्यात मेथीचे लाडू करतो. थंडीत आरोग्यास अतिशय उत्तम, उर्जावर्धक असतात. शिवाय मेथीचे लाडू  स्तनपान देणाऱ्या मातांसाठी  विशेष करून केले जातात. बाळंतीणीची रोग-प्रतीकारशक्ती आणि दुधाचे प्रमाण वाढावे तसेच बाळाला जन्म दिल्यामुळे झालेली शरीराची झीज भरून येण्यासाठी जी पोषणमूल्ये  आणि उष्मांक आवश्यक असतात ती देण्यासाठी मेथी व  लाडूतील अन्य घटक मदत करतात. हि सोप्पी पाककृती माझी आजी बनवायची त्याप्रमाणे आहे.

Read this recipe in English......click here.


साहित्य:
  • मेथी पीठ/पुड - २५० ग्रॅम (बाजारात मिळते)
  • बारीक रवा- १ किलो
  • सुके खोबरे, किसुन - २५० ग्रॅम
  • गूळ, चिरून- १ किलो
  • हलीम/हळीव/अहळीव- १०० ग्रॅम
  • डिंक- ३०० ग्रॅम
  • जायफळ पुड- १ टेबलस्पून 
  • खसखस- २० ग्रॅम
  • बदाम - १०० ग्रॅम
  • खारीक- १०० ग्रॅम
  • साजुक तूप- साधारण ५०० ग्रॅम
  • पाणी- अर्धा कप (साधारण एक वाटी)

कृती:
  • मेथी पीठात  १/४ कप तूप घाला व हाताने चोळून चोळून व्यवस्थित एकत्र करा आणि ते किमान २ दिवस तसेच ठेवा. मात्र रोज एकदातरी ते पीठ चोळावे.  
  • २ ते ८ दिवसानंतर लाडू करायला घ्या. रवा निवडून घ्या. 
  • कढईत ३-४ टेबलस्पून तूप घालुन रवा खमंग भाजा. बाजुला ताटात काढून ठेवा.  
  • त्यानंतर १ टिस्पून तूप घालुन हलीम खमंग भाजा. बाजुला ताटात काढून ठेवा.  
  • त्यानंतर खसखस खमंग भाजा. बाजुला ताटात काढून ठेवा.  
  • त्यानंतर किसलेले सुके खोबरे तांबूस रंग येईपर्यंत चुरचुरीत भाजून घ्या. भाजल्यावर हाताने थोडेसे चुरा. बाजुला ताटात काढून ठेवा. 
  • त्यानंतर कढईत तूप गरम करून, डिंक फुलेपर्यंत तळा. थंड झाल्यावर हाताने थोडेसे चुरा. बाजुला ताटात काढून ठेवा. 
  • खारकांच्या बिया काढून टाका व त्याचे छोटे छोटे करा.  
  • त्यानंतर त्याच तूपात बदाम आणि खारका तळा. थंड झाल्यावर खलबत्त्यात भरडसर कुटा किंवा मिक्सरवर भरड दळा.   
  • मोठ्या परातीत वरील भाजलेले सर्व साहित्य एकत्र करावे. जायफळ पूड घालावी आणि चांगले मिक्स करावे. बाजूला ठेवा.
  • जाड बुडाच्या कढईत किंव्हा पातेल्यात १ टेबलस्पून तूप गरम करावे. गूळ आणि पाणी घालावे. मध्यम आचेवर सतत ढवळत रहावे. गुल वितळुन हळुहळू पाक उकळायला लागेल. २ तारी पाक व्हायला हवा. आच कमी करा. पाक जास्त शिजला तर लाडू कडक होतात.  
  • पाक उकळायला लागला की लगेच त्यात परातीतील कोरडे मिश्रण त्यात टाकावे. चांगल्या मजबूत चमच्याने ढवळुन सर्व पटापट व्यवस्थित एकत्र करावे. 
  • थोडावेळ सतत ढवळत रहावे. सगळ छान एकजीव झाल पाहिजे. 
  •  गॅस बंद करून पातेले खाली उतरवा. हाताला जरासं तूप चोळुन पटापट लाडू वळा. हे मिश्रण थंड होण्याआधीच लाडू वळा. नंतर मिश्रण कडक होऊन लाडू वळले जात नाहीत. (मंद गॅस वाट जड तवा ठेवून त्यावर पातेले ठेवले, तर मिश्रण गरम रहाते.) 
  • पूर्णपणे थंड झाल्यावर लाडू डब्यात भरून ठेवा.

टीपा: 
  • काजू घातले तरी चालतील. बदामाप्रमाणेच काजू तुपात टाळून कुटून घ्यावेत. काजू घातले तर लाडू अधिक रुचकर बनतात. पण काजू आरोग्यास फारसे उपयुक्त नसल्याने टाळावे.   
  • २ तारी पाक म्हणजे चमच्याने थोडासा पाक काढून किंचित थंड करून दोन बोटाच्या चिमटीत धरून पाहावा. पाक बोटाला चिकट लागतो आणि बोटं लांब केल्यावर २ ते अधिक तारा दिसतात. (पाक जास्त शिजून १ तरी होईल. तरमग लाडू दगडासारखे कडक होतील.)   
  • थंडीत रोज सकाळी १ लाडू खाणे चांगले असते.  

No comments:

Post a Comment

आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास उत्साह मिळतो. आपला अभिप्राय, सुचना आम्हाला ज़रूर कळवा. आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच कायम राहो.