Friday, November 28, 2014

Avalyacha Kis (आवळ्याचा मावा किंवा कीस)

मोरावळ्याचे नियमितपणे सेवन करणे हे चांगले आरोग्य राखण्यासाठी मदत करते. पण बऱ्याच लहान मुलांना मोरावळा आवडत नाही. आवळा कॅन्डी प्रमाणे रुचकर आणि बनवायला अतिशय सोप्पा असा हा प्रकार आहे. मुलांना तर आवडेलच पण जेवल्यावर मुखशुद्धीसाठी पटकन तोंडात टाकायला मस्त.



Read this recipe in English.......click here.


साहित्य:
  • डोंगरी आवळे - ५०० ग्रॅम
  • साखर - सव्वा कप
  • आले, किसुन- ५० ग्रॅम
  • मीठ- १/४ टिस्पून

कृती:
  • आवळे स्वच्छ धुवा आणि पुसून घ्या. किसणीवर किसुन घ्या आणि मोठ्या वाडग्यात काढा. (शक्यतो काचेचा किंवा प्लॅस्टिकचा वाडगा वापरा.) 
  • त्यात साखर आणि मीठ घालावे. चांगले मिसळा आणि रात्रभर तसेच झाकून ठेवा.
  • दुसऱ्या दिवशी, आले स्वच्छ धुवून पुसून घ्यावे. त्याची साले काढून किसावे. किसलेले त्यातआले घालावे व चांगले ढवळावे. थोडावेळ मुरु द्यावे.
  • आवळा व आल्याचा रस सुटतो. (खरतरं त्या रसासकटच तो कीस सुकवायाचा असतो. पण त्यातला थोडासा रस काढून त्यात थोडे पाणी आणि किंचित मीठ टाकून तो सरबताप्रमाणे प्यावा. त्या ताज्या रसाची चव अप्रतिम लागते.) 
  • मोठ्या थाळ्यात किंव्हा प्लॅस्टिकच्या पेपरवर तो कीस रसासकट पसरावा. 
  • कडक उन्हात ५ ते ८ दिवस (प्रत्येक ठिकाणी उन्हाची तीव्रता वेगवेगळी असते म्हणून) अगदी खडखडीत वाळवावा. 
  • काचेच्या किंवा प्लॅस्टिकच्या हवाबंद बरणीत वाळलेल्या किस ठेवा. 

टिपा:
  • कीस जर पूर्ण वाळला गेला नाही तर तो फार काळ टिकत नाही.
  • तुम्हाला आवडत असेल तर आल्याचे प्रमाण वाढवू शकता.
  • वरील किसात २ टीस्पून जीऱ्याची पूड घातली तर एक वेगळी चव मिळेल.

Wednesday, November 19, 2014

Fish Fry (तळलेले मासे)

मासे तळणे खूपच सोप्प असतं आणि ते खूप चवदार लागतात.


Read this recipe in English......click here.

साहित्य: 
  • पापलेट - १ मध्यम आकाराचे  (किंव्हा साधारण ६-७ तुकडे)
  • हळद - १/२ टिस्पून
  • हिंग - १/४ टिस्पून
  • घरगुती मसाला किंवा मालवणी मसाला - 2 ते 3 टिस्पून करण्यासाठी (मालवणी मसाला बाजारात सहज उपलब्ध आहे.)
  • लसूण पाकळ्या- ८ 
  • कोकम/आमसूल- ६
  • मीठ- चवीनुसार 
  • तेल- आवश्यकतेनुसार 

कृती:
  • कमीतकमी पाणी वापरून लसूण आणि कोकम यांचे गुळगुळीत वाटण करावे. (या साठीचे पर्याय खाली वाचा)
  • हव्या त्या आकारात  मासे कापा.  त्याच्या पोटातील घाण व कल्ले काढून टाका. 
  • माश्याचे तुकडे २ वेळा काळजीपूर्वक धुवून घ्या.  
  • मीठ, मसाला, हळद, हिंग, कोकम - लसूण पेस्ट एकत्र करून माश्याला हळूहळू चोळा.  कमीतकमी अर्धा तास मसाल्यात मुरत ठेवा.  
  • तवा तापत ठेवा, तव्यावर २ टेबलस्पून तेल घालून पसरवा. गरम तव्यावर मध्यम ते मंद आचेवर मासे तळा. जरुरीनुसार बाजूने तेल सोडा   
  • दोन्ही बाजूनी खरपूस तळा.  
  • भाकरी, कालवण आणि भात बरोबर गरम गरम सर्व्ह करा.




टिपा:
  • आपण कोणत्याही प्रकारचे मासे किंवा कोळंबी  या प्रकारे तळू शकता. 
  • कोकमाऐवजी चिंचेचा कोळ किंवा लिंबाचा रस वापरू शकता.  पण अस्सल कोकणी चव कोकमच देते.
  • कोकमाऐवजी कोकमाचे आगळ वापरू शकता.
  • कृपया आले वापरू नका.
  • मी लसूण-कोकम पेस्ट जास्त प्रमाणात करते आणि फ्रीजर मध्ये ठेवते. याची दोन कारणे आहेत.…. एक म्हणजे छोट्या प्रमाणातले वाटण मिक्सरला चांगले गुळगुळीत होत नाही. (माझी आई अजूनही कोकम-लसणाची गोळी पाट्यावर बनवते.)  दुसर म्हणजे वेळेची बचत. १/२ कप लसूण आणि त्याहून थोडे कमी कोकम कमीत कमी पाणी वापरून एकत्र वाटून घ्यावे. मध्यम आकाराच्या माश्यासाठी २-३ टीस्पून पेस्ट लागेल. 
  • बोंबील आणि बांगडा तळायाच्या पद्धती भिन्न आहेत. मी नंतर लिहीन. 

Tuesday, November 18, 2014

Avala Supari (आवळा सुपारी)

आवळा सुपारी हि मुखशुद्धी आणि आरोग्यासाठी खूप चांगली आहे.
संशोधनात असे आढळले आहे की चांगल्या गुणधर्माचे व संत्र्यापेक्षा जास्त व्हिटॅमिन "सी" आवळ्यात आहेत . याच्या सेवनाने पचनशक्ती चांगली वाढते. आयुर्वेदात आवळ्याला अत्यंत गुणकारी म्हटले आहे.




Read this recipe in English........click here.

साहित्य:
  • आवळा - १/२ किलो 
  • मीठ किंवा शेंदेलोण/सैंधव मीठ- १ टेबलस्पून 
  • आले रस - १/४ कप (साधारण. २५-३० ग्रॅम आल्यापासून) 

कृती:
  • आवळे धुवून आणि प्रेशर कुकरच्या भांड्यात ठेवावेत. त्या भांड्यात अजिबात पाणी घालायचे नाही. (पण कुकरमध्ये पाणी घालायला विसरू नका) 
  • शिट्टी न लावता २०-२५ मिनीटे त्यांना शिजवावे. (म्हणजे आवळ्यांना थेट पाण्याचा संपर्क नको, वाफेवर शिजायला हवेत.) मऊ होई पर्यंत शिजले पाहिजेत. अगदी खूप मऊ नको. बोटाने दाबल्यास लगदा न होता त्यांचा आकार कायम राहून उघडले पाहिजेत म्हणजे आपण सहजपणे आतील बी काढू शकतो. 
  • त्यांना थंड होऊ द्या. त्याच्या बिया काढा. पाकळ्यांसारखे त्याचे भाग दिसतील. हवे तर तसेच ठेवा किंव्हा त्याचे अजून लहान तुकडे करा. लहान तुकडे लवकर सुकतात. 
  • कमीतकमी पाणी वापरून आले मिक्सरमध्ये बारीक वाटा किंवा बारीक किसणीवर आले किसून घ्या, पिळून किंव्हा गाळून त्याचा रस काढा. 
  • मोठ्या बाउलमध्ये आवळ्याचे तुकडे, मीठ आणि आले रस एकत्र करा. १ तास मुरु द्या नंतर मोठ्या ताटात पसरवून कडक उन्हात वाळत घाला. 
  • कडक उन्हात ५ ते ८ दिवस वाळवा. तुकडे पूर्णपणे सुकायला हवे आहेत. 
  • काचेच्या किंवा प्लॅस्टिकच्या हवाबंद डब्यात/बरणीत ठेवा. 

टिपा :
  • सुकवण्यापूर्वी आवळ्यावर २ टिस्पून जिरे पूड घालून हळूहळू चोळा. जिऱ्याचा स्वाद छान लागतो.  
  • अजून आरोग्यपूर्ण बनवण्यासाठी, आवळ्यावर १/२ टिस्पून हिंग घालू शकता. 
  • इथे आवळे उकडून घेतले आहेत. पण त्याऐवजी कच्चे सुद्धा वापरू शकतो. त्यासाठी आवळे आणि आले किसून घ्या. त्यांना मीठ आणि जिरे पावडर चोळा आणि कडक उन्हात वाळवा.

Saturday, November 15, 2014

Kanda Bhajee (कांद्याची खेकडा भजी)

बेधुंद कोसळणारा पाऊस आणि कपभर चहासोबत गरमागरम कांदाभजी म्हणजे पावसाच अस्सल समीकरण. हा पाऊस मोसमी असो व बेमोसमी  त्यात काही फरक पडत नाही.


साहित्य-
कांदे- ३
बेसन- १/२ कप
मीठ- चवीनुसार
जिरे पूड- १ टीस्पून
धणे पूड- १ टीस्पून
हळद- १/२ टीस्पून
हिंग- १/४ टीस्पून
लाल तिखट/मिरची पूड- १ टीस्पून किंव्हा आवडीनुसार
खायचा सोडा- चिमुटभर
तेल तळण्यासाठी- आवश्यकतेनुसार

कृती-
कांदे लांब पातळ चिरून घ्यावे.
त्यात वरील पैकी तेल सोडून सर्व साहित्य टाकावे.मिक्स करून अगदी थोडेसे पाणी टाकावे. (मिश्रण तयार केल्यावर लगेच भजी करावी नाहीतर कांद्याला पाणी सुटते व भजी कुरकुरीत होत नाहीत)
मग तेल तापवून त्यात ४ चमचे गरम तेलाचे मोहन टाकावे. हाताने थोडे थोडे मिश्रण घेऊन तेलात सोडावे. व तळून घ्यावे. ही भजी गरम गरम चटणीबरोबर खावी.

Friday, November 7, 2014

Shivalya/Tisarya Thapathapit (शिवळ्याचे किंव्हा तिसऱ्याचे थपथपीत/लिपती)

शिंपले/शिवळ्या/तिसऱ्या ह्या जस्त आणि कॅल्शियम यांनी समृध्द असतात त्यामुळे त्या अतिशय पोषक असतातच पण अतिशय चविष्ट असतात. थपथपीत/लिपती याचा कोकणी अर्थ आहे खूप रस्सा नाही, थोडासा अंगाबरोबरचा रस्सा.   



Read this recipe in English.........click here.

साहित्य:
  • शिंपल्या/शिवळ्या सालासकट -१ वाटा (साधारण ३ कप) 
  • कांदा, बारीक चिरून- १ कप 
  • टोमॅटो, बारीक चिरून- १/२ कप 
  • लसूण, ठेचून- ८ पाकळ्या 
  • घरगुती मसाला किंवा संडे मसाला किंवा मालवणी मसाला -३ ते ४ टीस्पून 
  • हळद- १/२ टिस्पून 
  • हिंग- १/४ टिस्पून 
  • कोकम/आमसुलं- २ ते ३ 
  • कोथिंबीर, बारीक चिरून- २ टेबलस्पून 
  • तेल - ३ ते ४ टेबलस्पून 
  • मीठ- चवीनुसार 

कृती:
  • नळाखाली चोळून चोळून २-३ वेळा शिंपल्या धुवून घ्या. जर काही माती व वाळू असेल तर निघून जाईल. 
  • एका छोट्या पातेल्यात १/४ पेक्षा पण कमी पाणी आणि शिंपल्या घालून झाकण ठेऊन शिंपल्या उघडेपर्यंत एक वाफ काढा. जास्त शिजवू नका, त्या वातड होतील. 
  • शिंपल्याच्या आतील मासांचे गोळे काढा. ज्या शिंपल्या उघडल्या नसतील त्या फेकून द्या. त्यात माती असते. 
  • ज्या पाण्यात आपण शिंपल्या उकळल्या ते पाणी वाया घालवू नका. हा स्टॉक आहे व सगळी चव त्यातच आहे. हे पाणी बारीक गाळणीने गळून घ्या कारण त्यात वाळू असण्याची शक्यता असते. 
  • एक पॅन मध्ये तेल गरम करावे. कांदा व लसूण घालून गुलाबी रंगावर परतावे. 
  • हळद आणि हिंग घालून परतावे. 
  • मसाला आणि टोमॅटो घालावा. टोमॅटो ३-४ मिनीटे किंवा तो मऊ होईतोवर परता. 
  • त्यात शिंपल्या टाकून जराश्या मसाल्यात परता. त्यात मीठ, कोकम आणि स्टॉक टाकून चांगले मिक्स करा. मंद आचेवर झाकण ठेऊन एक उकळी काढा. (यात अजून वेगळे पाणी वापरायची गरज नाही. रस्सा थोडा घट्ट हवा असेल तर १ टेबलस्पून भाजलेल्या खोबऱ्याचे वाटण टोमॅटोबरोबरच टाकून तेल सुटेपर्यंत परतून घ्या.) 
  • गॅस बंद करून त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करावे. झाकण व उकळण्याची 5 मिनीटे शिजू द्यावे. 
  • तांदूळाच्या भाकरीसोबत किंवा चपातीबरोबर गरमागरम सर्व्ह करावे.

Tuesday, November 4, 2014

Palak-Batata Cutlet (पालक-बटाटा कटलेट)

संध्याकाळी चहासोबत खाण्यासाठी चविष्ट आणि हेल्दी कटलेट ………….



Read this recipe in English......click here.

साहित्य:
  • पालक,चिरून - १+१/२ कप 
  • बटाटे, उकडून कुस्करलेले- १ कप (साधारण २ मोठे)
  • रताळे, उकडून कुस्करलेले- १/२ कप (साधारण १)
  • हिरव्या मिरच्या- ३ ते ४
  • लसुण- ६ पाकळ्या
  • जिरे पूड- १/२ टिस्पून
  • चाट मसाला- १ टिस्पून 
  • कॉर्न फ्लोअर - १ टेबलस्पून
  • मीठ-चवीनुसार (चाट मसाल्यात मीठ असते त्यानुसार मीठ घाला) 
  • तेल- आवश्यकतेनुसार 

कृती:
  • बटाटे आणि रताळे उकडून, सोलून कुस्करावे. (रताळे नसेल तर फक्त बटाटा वापरला तरी चालेल, चिमुटभर साखर घाला.) 
  • लसूण व हिरव्या मिरच्या भरडसर वाटून घ्याव्यात. 
  • पालक निवडून, धुवुन व बारीक चिरून घ्यावा.  
  • तेल सोडून वरील सर्व साहित्य एकत्र करा आणि चांगले मिक्स करा. मळुन गोळा तयार करा. (चिकट वाटत असेल तर ब्रेडचा चुरा घालावा.) 
  • लहान गोळे करून हव्या त्या आकाराचे कटलेट बनवा.  
  • एका पॅनमध्ये थोडेसे तेल गरम करून शालो फ्राय करावे. 
  • तयार झाल्यावर वरून थोडासा चाट मसाला भुरभुरावा आणि चिंचगूळाची चटणी किंवा टोमॅटो केचपबरोबर गरम वाढावेत. 

Monday, November 3, 2014

वरी तांदूळाचा भात आणि शेंगदाण्याची आमटी

आषाढी आणि कार्तिकी एकादशी स्पेशल :
वरी तांदूळाचा भात शेंगदाण्याच्या आमटीबरोबर मस्त लागतो.पण मी दिलेल्या पद्धतीने जर वरीचा भात केला तर नुसत्या उपवासाच्या बटाट्याची भाजी आणि दह्यासोबत किंव्हा उपवासाच्या चटणी सोबत सुद्धा छान लागतो. 

४ जणांसाठी
वरी तांदूळाचा भात 
साहित्य:
वरी तांदूळ (उपासाची भगर)- १ कप
गरम पाणी- २ + १/२ कप
तूप किंव्हा शेंगदाणा तेल - २ टेबलस्पून
जिरे- १ टिस्पून
हिरवी मिरची- १
खवलेले ओले खोबरे- २ टेबलस्पून
मीठ- चवीप्रमाणे

कृती:
वरी तांदूळ तांदूळ सोनेरी तपकीरी रंगावर भाजावेत.
पातेल्यात तूप गरम करावे, त्यात मिरची, जिरे व खोबरे घालून थोडे परत वे. त्यात वरी तांदूळ घालून थोडावेळ परतावे.
त्यात गरम पाणी घालावे व चवीनुसार मिठ घालून ढवळावे आणि पातेल्यावर झाकण ठेवून मंद आचेवर वरी तांदूळ शिजू द्यावा.
जर एकदम मऊसर भात/भगर हवी असेल तर पाण्याचे प्रमाण वाढवावे. पण या पद्धतीचा वरीचा भात मऊ चांगला लागत नाही.   
.................................................. ..................................................
शेंगदाण्याची आमटी 
साहित्य:
भाजलेले आणि सोललेले शेंगदाणे- १ कप
बटाटे- २ मध्यम (ऐच्छिक )
लाल मिरची पूड- २ ते ४ टिस्पून (आवडीप्रमाणे)
जिरे- १ टीस्पून
काळी मिरी दाणे - ४
तूप किंव्हा शेंगदाणा तेल -२ टेबलस्पून
पाणी- अंदाजे २ + १/२ कप ते ३ कप
गूळ किंवा साखर- चिमुटभर किंव्हा चवीनुसार (ऐच्छिक )
मीठ- चवीप्रमाणे

कृती:
प्रथम दाणे , जिरे आणि पाणी एकत्र करून मिस्करमध्ये बारीक वाटून घ्यावे.
बटाटा सोलून त्याचे छोटे तुकडे करावेत.
कढईत तूप गरम करून त्यात मिरे घालून फोडणी करावी. बटाट्याच्या फोडी,मिरची पूड व जरासे मीठ घालून परतून घ्याव्यात. थोडेसे पाणी घालून झाकण ठेऊन शिजत ठेवा. 
बटाट्याच्या फोडी शिजत आल्या कि त्यामध्ये दाण्याचे वाटण घालावे.त्यात पाणी, मिठ आणि गूळ घालावे.
बटाटा शिजल्यावर उकळी काढून गरमागरम वरीच्या भाताबरोबर वाढावे.

Saturday, November 1, 2014

Tandul Ghavane (झटपट घावणे)

"घावणे" आमच्या कोकणात अतिशय लोकप्रिय आहेत. मऊ, लुसलुशीत आणि जाळीदार असे हे घावणे न्याहारीला किव्हा जेवताना सुद्धा खाल्ले जातात. घावणे दोन प्रकारे केली जातात. रात्री तांदुळ भिजवुन सकाळी वाटुन त्याचे घावणे बनवायचे किंव्हा पुढे देत असलेल्या कृतीप्रमाणे तांदुळ पिठापासून झटपट घावणे बनवायचे.



Read this recipe in English......click here.

साहित्य:
  • तांदुळाचे पीठ- १ कप (पीठ मध्यम रवाळ, सरसरीत असावे, फार बारीक दळू नये ) 
  • पाणी- १+ १/४ कप (थोडेफार कमी-जास्त पाणी लागेल, सरसरीत असावे) 
  • मीठ- चवीनुसार 
  • तेल किंव्हा साजूक तूप - आवश्यकतेनुसार 

सूचना :
  • जाडा तांदूळ धुवून सावलीत वाळत घाला आणि दळून आणा. त्यामुळे घावणे मऊ, हलके आणि पांढरे शुभ्र होतील शिवाय बिघडण्याची शक्यता कमी होईल.
  • घावण्यासाठी पीठ ताजेच हव, जुन्या, रया गेलेल्या पीठाचे घावणे करताना तुटतात. 

कृती:
  • पीठ, जरुरीनुसार पाणी आणि मीठ एकत्र करून छान ढवळून घ्यावे. सर्व गुठळ्या मोडून काढाव्यात. 
  • नॉन-स्टीक डोसा तवा किंव्हा बीडाची कावील/तवा गरम करून त्यावर थोडेसे तेल पसरून घ्यावे. वाटीभर मिश्रण घेऊन तव्याच्या कडेपासून मध्यापर्यंत ओतावे. 
  • कडेने थोडेसे तेल सोडावे. झाकण ठेऊन २-३ मिनिटे शिजवावे. नंतर उलटून पुन्हा १-२ मिनिटे भाजावे. घावण डोश्यासारखे कुरकूरीत बनवू नका. 
  • गरम गरम घावणे नारळाची चटणी किंवा पिवळी सुकी बटाटा भाजीबरोबर मस्त लागतात. थंड झाले तरी चांगले लागतात. आम्ही नाश्ता मध्ये गूळ आणि तूपासोबत पण हे घावणे खातो. 
  • जेवणामध्ये मटण किंवा चिकन रश्यासोबत वाढतात. तसेच काळा वाटाणा किंव्हा चण्याच्या रश्यासोबत पण वाढतात. खरतरं हे कुठल्याही भाजीसोबत चांगले लागतात. 

टीपा:
  • चिमुटभर मेथी पूड टाकली तरी चालते, चांगली चव येते. 
  • ताक आणि मिरची घालून याचेच रुपांतर धिरड्यात होते. 

गोड पदार्थासाठी वापर: 
  • आमच्याकडे गणपतीत गौरी-शंकराला "घावण- घाटले" म्हणजेच  "घावणे- गुळवणी" याचा नैवेद्य दाखवला जातो. 
  • घाटले/ गुळवणी हे गूळ आणि नारळाचे दूध पासून बनवले जाते. बासुंदी सारखे दिसते. याची पाककृती मी नंतर देईन. 
  • उकडीच्या मोदकासाठी जसा आपण चव/सारण बनवतो, तो चव गरम घावण्यावर पसरून त्याची घडी घातली जाते. असे घावणे सुद्धा नैवेद्यात गोड पदार्थ म्हणून ठेवले जातात. 
  • असे गोड पदार्थांसाठी जेंव्हा घावणे बनवतात तेव्हा वरील जे प्रमाण दिले आहे त्यात १ टेबलस्पून गुळ टाकू शकता. त्यामुळे घावणे गोडसर लागतील. 
  • असे गोड पदार्थांसाठी जेंव्हा घावाने बनवतात तेव्हा तेलाऐवजी तूप आणि पाण्याऐवजी दुध किंव्हा नारळाचे दुध वापरले तर घावाने अजून रुचकर लागतील.