Thursday, March 27, 2014

Kamang Kakadi (खमंग काकडी/ काकडीची कोशिंबीर)

सोप्पी आणि रुचकर …Read this recipe in English.......... click here.

साहित्य:
 • हिरव्या काकड्या - २
 • हिरव्या मिरच्या, बारीक चिरून- २
 • लिंबाचा रस- १/२ लिंबू 
 • शेंगदाण्याचा कूट- २ टेबलस्पून 
 • ओले खोबरे, खवलेले -  २ टेबलस्पून (ऐच्छिक )
 • कोथिंबीर, बारीक चिरून- मुठभर 
 • साजूक तूप- १ टीस्पून 
 • जीरे- १/२ टीस्पून 
 • हिंग- १/४ टीस्पून 
 • साखर- १/२ टीस्पून  किंव्हा चवीनुसार 
 • मीठ- चवीनुसार 


कृती:
 • काकडी धुवून आणि सोलून घ्यावी. काकडीची टोके कापून टाकावी. 
 • काकडी थोडी चाखून पहावी, कधीकधी काकडी कडू असते. नंतर काकडी चोचवून घ्यावी किंव्हा बारीक चिरावी. चोचवलेल्या काकडीला थोडे मीठ चोळून ठेवावे. २-३ मिनिटांनी काकडी पिळावी व त्यातील जास्तीचे पाणी काढून टाकावे. 
 • काकडी, शेंगदाण्याचा कूट, ओले खोबरे, कोथिंबीर, मिरची,  साखर, लिंबाचा रस व थोडेसे मीठ (मीठ घालताना काळजीपूर्वक घालावे, कारण आधीच काकडीला मीठ लावून ठेवले होते) घालून छान एकत्र करावे.
 • कढल्यात तूप गरम करून त्यात जीरे आणि हिंग घालून फोडणी करावी व काकडीत घालावी. झाली तयार खमंग काकडी …… 

Monday, March 24, 2014

Pasta with Tomato Sauce (पास्ता विथ टोमाटो सॉस)

पास्ता विथ टोमाटो सॉस ………… हा पास्त्याचा सगळ्यात रुचकर आणि लोकप्रिय प्रकार. चला तर मग पाहू या कसा बनवायचा.


Read this recipe in English....... click here. 


टोमाटो सॉस बनवण्यासाठी :

साहित्य:
 • टोमाटो- ६ मध्यम आकाराचे  (लालबुंद, पिकलेले असे वापरावेत.)
 • कांदा, बारीक चिरून  - १ मोठा
 • लसुण, बारीक चिरून- १० पाकळ्या
 • मिक्स हर्ब्स - १ टीस्पून
 • काळी मिरी पूड किंव्हा कुटून-  १ टीस्पून
 • चिली फ्लेक्स- १ टीस्पून
 • लाल मिरची पूड- १/२ टीस्पून
 • टोमाटो केचप- २ टीस्पून
 • ऑलिव ओईल किंव्हा बटर - ३ टेबलस्पून
 • मीठ- चवीनुसार
 • पाणी- १ कप
कृती:
 • पाणी उकळत ठेवा. उकळी आली कि त्यात टोमाटो टाकून २-३ मिनिटे शिजवून घ्या.  सालाला तडे गेले कि समजावे टोमाटो शिजले.
 • थंड झाल्यावर साले काढून टोमाटोचे तुकडे करा आणि मिक्सर मध्ये वाटून त्याची प्युरी बनवा.
 • प्यान मध्ये तेल  गरम करून कांदा आणि लसूण गुलाबी रंगावर परतून घ्या.
 • त्यात मिरची पूड आणि मीठ घालून जरास परता.
 • त्यात टोमाटो प्युरी,  मिक्स हर्ब्स,  चिली फ्लेक्स, काळी मिरी पूड,  टोमाटो केचप व पाणी टाका.  (शक्यतो टोमाटो शिजवण्यासाठी वापरलेलेच पाणी वापरा. )  छान एकत्र करून उकळी येऊ द्या. मध्ये मध्ये ढवळत रहा.
 • हा सॉस तुम्हाला लगेच वापरायचा नसेल तर थंड करून फ्रिझरमध्ये ठेवा.  महिनाभर चांगला राहील.

पास्ता बनवण्यासाठी:  

साहित्य:
 • पेने पास्ता किंव्हा इतर पास्ता- १ पाकीट (२५० ग्रॅम )
 • टोमाटो सॉस- वर कृती दिली आहे
 • गाजर, छोटे चौकोनी तुकडे करून- १/४ कप
 • ब्रोक्कोली- १/२ कप
 • सिमला मिरची- १/२ कप
 • बेबी कॉर्न्स, छोटे तुकडे करून -१/४ कप (किंव्हा स्वीट कॉर्नचे दाणे, उकडलेले - १/४ कप)  
 • ऑलिव ओईल किंव्हा बटर - जरुरीप्रमाणे 
 • चीज,किसलेले - १/४ कप 
 • मीठ- चवीनुसार
कृती:
 • पास्ता च्या पाकीटावर दिलेल्या सूचनेप्रमाणे पास्ता शिजऊन घ्यावा. (पाणी उकळत ठेवावे, त्यात मीठ घालावे. उकळी आली की पास्ता टाकून ८-१० मिनिटे शिजवावा. जास्त शिजऊ नये, मऊ पडतो. शिजला कि चाळणी मध्ये ओतून निथळत ठेवावा. वरून थंड पाणी ओता.)  
 • थोड्याश्या तेलावर मीठ आणि मिरी पूड घालून सर्व भाज्या एक एक करून २-३ मिनिटे परतून घ्याव्यात. 
 • वर सांगितलेला टोमाटो सॉस उकळत ठेवावा, त्यात परतलेल्या भाज्या, उकडलेला पास्ता, किसलेले चीज घालून व्यवथित एकत्र करून घ्या. 
 • वरून किसलेले चीज घालून गरमागरम वाढा आणि गरमागरम खा.  
सूचना:
 • भाज्या आवडत नसतील तर नाही वापरल्या तरी चालतील. नुसता सॉस व  चीज मधला पास्ता पण छान लागतो. 
 • भाज्यांच्या एवजी परतलेले चिकनचे तुकडे घातले की झाला चिकन पास्ता.         
 • पास्ता वेगवेगळ्या आकारात बाजारात उपलब्ध आहे.   Friday, March 21, 2014

Ratale aani Gajarache Cutlet (रताळे आणि गाजराचे कटलेट)

रताळे आणि गाजराचे कटलेट खरच खूप छान लागत.  आपण नेहमी बटाटा वापरून कटलेट बनवत असतो, रताळे वापरल्याने एक वेगळी चव मिळते.Read this recipe in English........ click here.


साहित्य:
रताळे - १ मोठे ( १ १/२ कप)
गाजरे, किसून - २  (१ कप)
हिरव्या मिरच्या- २ किंव्हा आवडीप्रमाणे
जीरे - १/२ टीस्पून
हळद- १/२ टीस्पून
गरम मसाला- १/२ टीस्पून
कॉर्न फ्लोअर- २ टीस्पून
कोथिंबीर, चिरून- मुठभर
मीठ- चवीप्रमाणे
बारीक रवा (वरून लावण्यासाठी)- आवश्यकतेनुसार
तेल (तळण्यासाठी )- आवश्यकतेनुसार

कृती:
रताळे स्वच्छ धुवून उकडून घ्या. साले काढून व किसून किंव्हा हाताने चुरून घ्या,
गाजरे किसून थोडी वाफऊन किंव्हा ३ मिनिटे मायक्रोवेव करून घ्या.  नंतर गरज असल्यास पिळून घ्या.
मिरच्या आणि जीरे खलबत्त्यात कुटून घ्या किंव्हा जाडसर वाटा.
रताळ, गजर, कोथिंबीर, मिरचीचा ठेचा, हळद, गरम मसाला, मीठ आणि  कॉर्न फ्लोअर सर्व एकत्र करून मळून घ्या. त्याचे छोटे छोटे गोळे बनवा.
रव्यात घोळवून त्याला कटलेटचा आकार द्या.
सोनेरी रंगावर शालो फ्राय करा.
गरमागरम कटलेट केचप किंव्हा चटणीसोबत वाढा.      

रताळे उपलब्ध नसेल तर बटाटा वापरला तरी चालेल. उपवासाला न चालणारे जिन्नस वगळून, कॉर्न फ्लोअर एवजी आरारोट वापरले कि मग हे कटलेट उपवासाला पण चालतील कि राव……Thursday, March 13, 2014

Chicken Kadhai (चिकन कढाई )

चिकन कढाई  वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. त्यातली मला जी आवडते आणि करायला पण सोप्पी आहे अशी हि पाककृती ……… नक्की करून बघा.
साहित्य:
 • चिकन- ५०० ग्रॅम 
 • दही- १/२ कप 
 • आले लसूण पेस्ट- ३ टीस्पून 
 • हळद- १/२ टीस्पून 
 • हिंग- १/२ टीस्पून 
 • लाल मिरची पूड- २ ते ३ टीस्पून 
 • मीठ- चवीनुसार  
 • कांदा, बारीक चिरून - १ कप (२ मध्यम )
 • टोमाटो, बारीक चिरून- १/२ कप (१ मध्यम)
 • हिरव्या मिरच्या- २
 • मसाला वेलची- २
 • तमाल पत्र- ४
 • लवंगा- २
 • काळी मिरी- ५
 • दालचिनी- १ इंचाचा तुकडा 
 • जीरे- १/२ टीस्पून   
 • धणे पूड- १ टीस्पून 
 • गरम मसाला- १ टीस्पून ( ज्यामध्ये मिरची पूड नसेल असा आणि शक्यतो पंजाबी गरम मसाला वापरावा) 
 • कसुरी मेथी- १ टीस्पून 
 • तेल- ४ ते ५ टेबलस्पून 
 • कोथिंबीर, बारीक चिरून -  मुठभर 

कृती:
 • चिकन धूवुन त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यावेत. 
 • चिकनला दही, आले लसूण पेस्ट, हळद, हिंग, लाल मिरची पूड, मीठ चोळून २-३ तासांसाठी मुरत ठेवावे.
 • कढईत तेल गरम करून सर्व अख्खे गरम मसाले आणि कांदा घालून, तो सोनेरी रंगावर परतून घ्यावा. 
 • त्यात अख्ख्या मिरच्या व टोमाटो घालून मऊ होईपर्यंत परतावा. 
 • त्यात चिकन घालून कढईच्या बाजूला तेल सुटेपर्यंत परतावे. 
 • नंतर गरम मसाला, धणे पूड घालून नीट एकत्र करून झाकण ठेवा आणि मंद आचेवर १५ ते २० मीनिटे किंव्हा चिकन शिजेपर्यंत शिजू द्या. (जास्तीचे पाणी घालू नका, दही घातल्यामुळे चिकनला पाणी सुटेल व त्या पाण्यावर चिकन शिजेल.) मधेमधे हाताने ढवळा. मध्येच कसुरी मेथी हातावर चुरून त्यात घाला. 
 • वरून कोथिंबीर पेरून गरमागरम चिकन चपाती किंव्हा तंदुरी रोटी आणि जीरा राइस सोबत वाढा. पावाबरोबर पण मस्त लागत. 


  
      
   

Wednesday, March 12, 2014

Ole Kaju-Matar Rassa (ओले काजू आणि मटारची रस्सा भाजी)

मार्च सुरु झाला की कोकणात ओले काजू यायला लागतात. आदिवासी बायका हे ओले काजू विकायला आणतात. ते खरेदी करायला खव्वयांची एकच झुंबड उडते. आमच्या घरात ओले काजूगर म्हणजे जीव की प्राण. पण काजू सोलताना त्याच्या चिकानं हाताची साले निघतात. पण चव इतकी अप्रतिम की हाताची साले गेली तरी बेहत्तर……….
हे ओले काजू वांग्याच्या भाजीत किंव्हा अंड्यासोबत किंव्हा चिकन मध्ये चांगले चांगले लागतात. आज पाहू या मटार सोबत.


Read this recipe in English........... click here. 


साहित्य:
 • ओले काजू, सोललेले - १ कप 
 • मटार- १ कप 
 • बटाटा- १ मध्यम 
 • कांदा,  चिरून- १ कप 
 • टोमाटो, चिरून- १/२ कप 
 • आले लसूण वाटण- २ टीस्पून 
 • हळद- १/२ टीस्पून 
 • हिंग- १/४  टीस्पून
 • मालवणी मसाला किंव्हा घरगुती मसाला- ३ टीस्पून
 • गरम मसाला- १ टीस्पून 
 • मीठ- चवीनुसार 
 • तेल- ३ ते ४ टेबलस्पून 
 • कोथिंबीर, बारीक चिरून- मूठभर 


 कृती:
 • काजू व्यवस्थित सोलून घ्यावेत. काजू सोलताना हाताला तेल चोळावे. नाहीतर हात फार खाजतात आणि काळे होतात. ओले काजु थोडा वेळ पाण्यात भिजत घालावेत, म्हणजे सालं सहज निघून येतील. सालं काढल्यावर काजू पाण्यात स्वच्छ धुऊन घ्यावेत.
 • बटाटे सोलून साधारण १ इंचाचे तुकडे करावेत. 
 • एका कढईत तेल गरम करून कांदा सोनेरी रंगावर परतून घ्यावा. 
 • त्यात हिंग, हळद आणि मसाला टाकून काही वेळ परतावा. 
 • त्यात आले-लसूण पेस्ट टाकून जरास परतावं. 
 • त्यात काजू, मटार, बटाटे टाकून थोडस पाणी टाकून व्यवस्थित मिसळून मंद आचेवर ५-६ मिनिटे झाकण ठेऊन शिजवावे. 
 • त्यात टोमाटो, गरम मसाला आणि मीठ टाकून  छान एकत्र करून पुन्हा एक वाफ काढावी. 
 • नंतर त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून झाकण ठेऊन काजू, बटाटा शिजेपर्यंत शिजू द्यावे. 
 • कोथिम्बिर टाकून भांडे उतरावे. 
 • चपाती सोबत गरमागरम खायला द्यावे.

टिप:
 • तुम्ही तुमचा स्वतःचा घरगुती मसाला वापरू शकता. 
 • मालवणी किंव्हा घरगुती मसाला नसेल तर (१ टीस्पून मिरची पूड + २ टीस्पून गरम मसाला किंव्हा गोड मसाला) असे वापरा. 
 •  काजू आकाराने मोठे असले तर शिजायला वेळ लागतो. अर्धवट शिजलेले ओले काजू  अजिबात चांगले नाहीत.  
 • मटार फ्रोझन असतील तर जर उशिराने घाला नाहीतर जास्त शिजतील.  
 • रस्सा घट्ट करण्यासाठी थोडेसे भाजलेल्या खोबऱ्याचे वाटण वापरू शकता, पण मी या भाजीसाठी नाही वापरत. 
 • सालं काढून काजू फ़्रीजर मध्ये ठेवले तर महिनाभर चांगले रहातात. 
    


  

Monday, March 10, 2014

खव्याची पोळी

गोड, खुसखुशीत, तोंडात विरघळणारी खव्याची पोळी चवीला  अप्रतिम लागते.  करायलाही खूप सोप्पी. पेढे-बर्फी उरली आहे का?…… मग त्यापासूनही करता येण्यासारखी.     Read this recipe in English........... click here. 


साहित्य :
 • तांदूळ पीठ  किंव्हा मैदा - आवश्यकतेनुसार लाटण्यासाठी 
 • साजूक तूप-  आवश्यकतेनुसार भाजण्यासाठी 
पोळीसाठी :
 • गहू पीठ (कणिक)-  १ कप 
 • मैदा- १/२ कप 
 • बारीक रवा- १/४ कप 
 • तेल (मोहन)- १/४ कप 
 • मीठ- १/४ टीस्पून 
 • पाणी - अंदाजे ३/४ कप ते १ कप 
सारणासाठी :
 • खवा- १ कप (२०० ग्रॅम )
 • खसखस- १ टेबलस्पून  
 • पिठीसाखर - ३/४ कप ते १ कप 
 • जायफळ किंवा वेलची पूड - १ टीस्पून 
 • कणिक- १/४ कप 
 • साजूक तूप- १ टीस्पून  
 • दुध- १ चमचा (जर आवश्यकता वाटली तरच )

कृती :
 • कणिक, मैदा, रवा, मीठ एकत्र करावे व कडकडीत मोहन घालून कणिक दोन तास भिजवून ठेवावी. कणिक नेहमीपेक्षा घट्ट असायला हवी नाहीतर पोळी चिवट होते.   
 • खसखस खमंग भाजून जाडसर कुटून घ्यावी. 
 • पिठीसाखारेतील गुठळ्या मोडून घ्याव्यात.  
 • कणिक १ टीस्पून तुपावर खमंग भाजावी.  दुसऱ्या बाउल मध्ये काढून ठेवावी.  
 • खवा मंद आचेवर गुलाबीसर भाजून घ्यावा. खवा कोमट असतानाच गाठी मोडून मळून घ्यावा. 
 • खवा, भाजलेली कणिक, पिठीसाखर, खसखस कुट, वेलची पूड एकत्र करून सारण छान मऊसर मळून घ्यावे. सारण  खूप कोरडे वाटल्यास दुधाच्या हाताने मळून घ्यावे. गुठळ्या अजिबात असू नयेत.   
 • सारणाचे लिंबा एवढ्या आकाराचे गोळे करावेत. 
 • कणकेचे सुद्धा लिंबा एवढ्या आकाराचे गोळे करावेत. 
 • हाताला तूप लाऊन कणकेचा एक गोल घेऊन त्याचा वाटीसारखा आकार करून त्यात सारणाचा गोळा भरून (पुरण पोळी प्रमाणे) तोंड बंद करावे. 
 • तांदळाच्या पीठावर  नेहमीप्रमाणे हलक्या हाताने पोळी लाटावी. खव्याचे सारण बाहेर येणार नाही याची काळजी घ्या. 
 • पोळी मंद ते मध्यम आचेवर तव्यावर गुलाबी रंगावर भाजावी. भाजताना बाजूने थोडे थोडे तूप सोडून भाजावी. अश्या प्रकारे  सर्व पोळ्या करून घ्याव्यात. 
 • गरमागरम असतानाच दुधासोबत वरून तुपाची धार सोडून खायला द्यावी. 
टीप: 
तुमच्याकडे खव्याचे पेढे-बर्फी काही उरले असेल तर त्यापासूनही करता येईल.  फूड-प्रोसेसर मध्ये पेढे-बर्फी, अगदी थोडेसे दुध आणि चवीप्रमाणे पिठी साखर टाकून छान मळून घ्या.। सारण तयार. बाकी कृती वरील प्रमाणेच.