Friday, November 29, 2013

Mugache Ladu (मुगाचे पौष्टीक लाडू)

साधारणपणे मुगाचे लाडू हे नेहमीच्या (साल काढलेल्या ) डाळीच्या पीठापासून बनवले जातात.  परंतु मी (खरतरं माझ्या सासूबाईंनी) इथे थोडा बदल केला आहे. सालवाली मुगाची डाळ आणि इतर साहित्य वापरून  हे लाडू अधिक पौष्टीक  बनवले आहेत.  

हे लाडू उपवासाला पण चालतात. थंडीच्या दिवसांत भरपूर उष्मांक देतात. शिवाय गरोदर आणि स्तनपान देणाऱ्या स्त्रीयांसाठी अत्यंत उपयुक्त असे हे लाडू आहेत. 


साहित्य:
  • सालवाली मुगाची डाळ- २५० ग्रॅम 
  • पिठीसाखर- १०० ते १२५ ग्रॅम (तुम्हांला कितपत गोड आवडत त्याप्रमाणात )
  • साजूक तूप- १२५ ग्रॅम 
  • बदाम पूड- १/४ कप (साधारण अर्धी वाटी )
  • खारीक पूड-  १/४ कप (साधारण अर्धी वाटी )
  • डिंक- २ टेबलस्पून 
  • काळ्या मनुका- १/४ कप (साधारण अर्धी वाटी )
  • जायफळ पूड- १/२ टीस्पून 
  • वेलची पूड- १ टीस्पून 

कृती :

  • सालवाली मुगाची डाळ खमंग गुलाबी रंगावर भाजून घ्यावी. थंड झाल्यावर मिक्सरवर दळावी. 
  • डिंक थोड्याश्या तूपात फुलवून (तळून ) घ्यावा. मिक्सरवर जाडसर दळून घ्यावा. 
  • पिठीसाखारेतील गुठळ्या मोडून, ती चाळून घ्यावी.
  • एका जाड  बुडाच्या भांड्यात/कढईत किंव्हा नॉन-स्टिक प्यानमध्ये गरजेप्रमाणे तूप घेऊन  मुगाचे पीठ खमंग वास येईपर्यंत मध्यम  ते मंद आचेवर (  जसे बेसन लाडू साठी बेसन भाजतो तसे ) भाजावे.  सतत हलवावे अन्यथा खालून जळण्याची भिती असते.
  • थंड झाल्यावर चवीप्रमाणे पिठीसाखर  इतर सर्व पदार्थ त्यात मिसळून लाडू बांधावेत.
टीप: साखर वापरायची नसेल तर मेथीच्या लाडूला जसा आपण गुळाचा पाक करतो तसा करून भाजलेले मुगाचे पीठ व इतर सर्व साहित्य पिठीसाखर वगळून त्यात घालून लाडू वळावेत. यात तूप कमी वापरले तरी चालते.  

Tuesday, November 12, 2013

Dudhi Parathe (दुधीचे पराठे)

दुधीची भाजी म्हटलं की अनेक जणांची नाके मुरडतात. पण दुधी सारखी पौष्टिक भाजी नाही. माझ्या मुलांना आणि त्यांच्या बाबांना सुध्दा ही भाजी  आवडत नाही. मग काय अशी हार  मानायची का? म्हणूनच त्यासाठी पराठ्यांचा पर्याय एकदम योग्य आहे. पौष्टिक आणि रुचकर असे हे पराठे ………….



साहित्य:
दुधी भोपळा- १ मध्यम आकाराचा (साधारण किसल्यावर २ १/२ कप)
कणिक (गव्हाचे पीठ)- ३ कप 
बेसन- ४ टीस्पून 
हळद- १/२ टीस्पून 
हिंग- १/४ टीस्पून 
तीळ - २ टीस्पून 
हिरव्या  मिरचीचा ठेचा किंव्हा लाल मिरची पूड- २ टीस्पून किंव्हा आवडीप्रमाणे 
जिरे पूड किव्हा खरडलेलं जिरे - १ टीस्पून 
आले-लसूण वाटण (पेस्ट)- २ टीस्पून 
चिरलेली कोथिंबीर- १/४ कप 
मीठ- चवीप्रमाणे 
मळण्यासाठी तेल-  २ टेबलस्पून 
भाजण्यासाठी तेल - आवश्यकतेनुसार  



कृती:

दुधी भोपळा बियांसकट किसून घ्यावा. त्याला सुटलेले पाणी फेकून देऊ नये, त्यामुळे जीवनसत्वे नष्ट होतात. 
एका  काचेच्या बाउलमध्ये  कीस , आले-लसूण वाटण, बेसन, हळद, हिंग घेऊन ते ३ मिनिटे मायक्रो-व्हेव करावे. 
किंव्हा प्यांमध्ये २ टीस्पून तेल गरम करून त्यात आले-लसूण वाटण, बेसन, हळद, हिंग  परतून दुधी चा कीस ३-४ मिनिटे  शिजवावा. नंतर बेसन घालून ढवळून ग्यास बंद करावा.

मिश्रण थंड झाल्यावर त्यात तीळ, मिरची पूड किव्हा ठेचा, कोथिंबीर व मीठ टाकावे.  छान एकत्र करून त्यात कणिक घालावे. जरूर वाटल्यास आणखी कणिक घालावयास हरकत नाही. पाणी अजिबात वापरू नये. तेल टाकून कणिक माळून घ्यावे. त्याचे सारख्या  बनवावे. 

लाटताना प्लास्टीक पेपर घेतल्यास पीठ  लागते, त्यामुळे भाजताना सुद्धा कमी तेल लागते. शिवाय पराठा लाटणे  जाते. 

तव्यावर दोन्ही बाजूंनी थोडे तेल लाऊन पराठे भाजून घ्यावेत. 
हे पराठे कच्च्या टोमाटोची चटणी, छुंदा, दही, चटणी, केचप किंव्हा  लोणचे ….  कश्याबारोबरही  छान लागतात.   






Monday, November 11, 2013

Padavalachya Biyanchi Chutney (पडवळाच्या बियांची चटणी)

आपण नेहमी पडवळाची भाजी करताना त्याच्या बीया फेकून देतो. पण  दक्षिण भारतात  त्यापासून चटणी बनवतात. मी त्यात थोडे बदल करून हि चटणी बनवली आहे. इडली-डोश्या बरोबर नेहमीच्या चटणीला बदल म्हणून ही चटणी चांगली वाटते.



साहित्य:
पडवळाच्या बीया आतील लगद्यसह - १/२ कप 
हिरव्या मिरच्या - २ ते ३
राई - १/२ टीस्पून 
जीरे - १/४ टीस्पून 
मेथीदाणे - २ ते ३
हळद- १/४ टीस्पून 
हिंग- चिमुटभर 
तेल- १ टेबलस्पून 
चिंच- एका गोटी एवढी (किंव्हा २ टीस्पून  कोळ )
गूळ, चिरलेला- १ टीस्पून किंव्हा आवडीप्रमाणे 
चिरलेली कोथिंबीर - २ टेबलस्पून 
मीठ- चवीप्रमाणे 

कृती:
एका प्यानमध्ये तेल  करून राई घालावी, तडतडली की मिरच्या, जीरे, हळद, हिंग  करावी.  त्यात बीया व लगदा आणि मीठ टाकून मंद आचेवर ३-४  परतून घ्यावा घ्यावा. थंड होऊ द्यावा. 

वरील मिश्रण, चिंचेचा कोळ, गुळ आणि कोथिंबीर घालून वाटून घ्यावा ……… चटणी तयार.  


Saturday, November 2, 2013

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि दिवाळी फराळ

लक्ष दिव्यांनी उजळल्या दाही दिशा, घेऊन नवी उमेद नवीन आशा 
हि दिवाळी आणि येणारे नवीन वर्ष तुम्हाला आणि तुमच्या परिवारास सुखाची जावो हीच सदिच्छा!
तुम्हाला आणि तुमच्या परिवारास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!




  दिवाळी फराळ: (पाककृती वाचण्यासाठी पाककृतीच्या नावावर क्लिक करा.)