Tuesday, October 29, 2013

Besan Ladu (बेसन लाडू)

दिवाळीत तर करायलाच पाहिजेत असे बेसन लाडू ...........पण लांबच्या प्रवासात सोबत न्यायला सुद्धा उत्तम.
  

Read this recipe in English....... click here.

साहित्य:
 • चणाडाळ - ५०० ग्रॅम
 • साजूक तूप- २५० मिली  
 • पिठी साखर - ३५० ते ३७५ ग्रॅम (आवडीप्रमाणे थोडी कमी-जास्त वापरावी.)
 • वेलचीपूड- २ टीस्पून 
 • बेदाणे किंवा सुकामेव्याचे तुकडे- आवडीनुसार (साधारण अर्धा कप)

कृती:
 • डाळ अगदी २-३ मिनिट जराशी गरम करावी. (दमटपणा घालवण्यासाठी डाळ नुसती गरम करायची आहे, भाजायची नाही. सणसणीत उन्हात तापवली तरी चालेल.)  
 • गिरणीतून दळून आणावी. 
 •  बेसन तूपामध्ये मंद ते मध्यम आचेवर खमंग भाजून घ्यावे. भाजताना सारखे ढवळत राहावे. नाहीतर खालून करपेल. तूपात बेसन घातल्यावर आधी घट्ट होईल आणि काही वेळाने पातळ व्हायला लागेल. पातळ झाले तरी काळजी करू नये. मंद ते  मध्यम आचेवरच भाजावे, नाहीतर  नुसता रंगच बदलेल पण बेसन कच्चेच राहील. 
 • बेसन छान बदामी रंगावर भाजले गेले कि गॅस बंद करावा. (पिवळ्या रंगाचे लाडू कच्चट लागतात.) 
 • बेसन पूर्ण गार होवू द्यावे. 
 • पिठीसाखर चाळून आणि गुठळी मोडून घ्यावी. 
 • नंतर त्यात आवडीप्रमाणे सुकामेवा, वेलचीपूड आणि गरजेनुसार पिठीसाखर घालावी. पिठीसाखर एकदम न घालता चव  घेत थोडी-थोडी अंदाजाने टाकत जावी. आपल्याला किती गोड आवडते त्याप्रमाणे थोडी कमी-जास्त करावी.  
 • नीट एकत्र मळून लाडू वळावेत. कधी कधी लाडूचे पिठ पातळ झाल्यासारखे वाटते आणि लाडू बसतात. पण काही तासांनी लाडू वळले कि छान होतात.
 • साजूक  वापरल्याने लाडू फार चविष्ट होतात पण मऊ होतात,  ठेवले कि एकमेकांना चिकटतात. वाढतेवेळी पुन्हा वळून द्यावेत.

सुचना: 
 • जेव्हा तुम्ही साजूक तूप वापरता , तेव्हा २५० ग्रॅम मधले साधारण अर्धी वाटी बाजूला काढून ठेवावे. कारण लाडू जास्त मऊ  होतात.
 • बाजारात मिळणारे साजूक तूप बहुधा २५० मिली म्हणजे २२६ ग्रॅम असते. तेवढे सगळे तूप वापरले तरी चालेल.   
 • पण वनस्पती तूप (डालडा) वापरणार असाल तर पूर्ण २५० ग्रॅम वापरावे. पण शक्यतो साजूक तुपच वापरावे. लाडू चविष्ट होतात आणि तोंडात विरघळतात.
 • किंव्हा १०० ग्रॅम डालडा + १५० ग्रॅम साजूक तूप असे प्रमाण घ्यावे.
 • कधीही भाजलेले  बेसन गरम असताना त्यात पिठी साखर घालू नये. आणि एकदा का बेसन मध्ये पिठी साखर घातली की ते मिश्रण कधीही गरम करू नये. यामुळे पिठी साखरेचे गोळे/गुठळ्या  तयार होऊन लाडू बिघडतात.      
 • घाई नसेल तर आदल्या दिवशी बेसन भाजून आणि पिठी साखर वै. टाकून मळून ठेवावे. दुसऱ्या दिवशी मिश्रण थोडे चाखून बघावे. गोड कमी असेल तर अजून पिठी साखर लाडू वळावे. यामागचे कारण असे की बेसनात साखर मुरते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी लाडू अगोड लागतात. साखरेचे प्रमाण अगदी योग्य हवे असेल तर लाडू दुसऱ्या वळावेत.       


शेवटी काय तर …. संयम आणि तासंतास न कंटाळता, सावधपणे  बेसन भाजणे यातच चविष्ट बेसन लाडूचे गुपित दडले आहे. 

Thursday, October 24, 2013

Masalebhat (मसालेभात)

लग्नासारखे शुभ समारंभ असले कि  मसालेभात हा हवाच. कोशिंबीर, चटणी, पापड, पुरी-भाजी, भजी, जिलेबी आणि मठ्ठा … या शिवाय बेत अपुरा आहे नाही !Read this recipe in English.......click here.

साहित्य:
बासमती किंव्हा आंबेमोहर तांदूळ - १ १/२ कप  (उत्तम प्रतीचा जुना तांदूळ वापरावा, कोलम पण चालेल.)
मटार - १/२ कप
फ्लॉवरचे तुरे- १/२ कप
तोंडली,  चिरून - १/४ कप
वांग, उभ चिरून- १/४ कप
गाजर, सोलून आणि तुकडे करून- १/४ कप
फरसबी- तुकडे करून- १/४ कप
भिजवलेले शेंगदाणे- १/४ कप
काजू तुकडा- १/४ कप
मनुका- १ टेबलस्पून
राई/ मोहरी- १ टीस्पून
हिंग- १/४ टीस्पून
हळद- १/२ टीस्पून
कडीपत्ता- १ डहाळी
तेल- ३ ते ४ टेबलस्पून
गरम पाणी- ३ ते ३ १/४ कप
मीठ चवीनुसार
बारीक चिरलेली कोथिंबीर- १/४ कप
खवलेले ओले खोबरे- १/२ कप
साजूक तूप- जरुरीनुसार

काळा मसाला-
खिसलेले  सुके खोबरे - १ टेबलस्पून
तीळ - १ टेबलस्पून
लवंग- ४
जीरे - २ टीस्पून
मसाला वेलची- २
दालचीनी- २ इंचाचे तुकडे
सुक्या लाल  मिरच्या - ३ ते  ४

(वरील सर्व जिन्नस थोड्याश्या तेलावर खमंग भाजून घ्यावेत. आणि मिक्सरमध्ये दळून घ्यावेत. मिरची ब्याडगी वापरली आहे. जर काळा मसाला करायला वेळ नसेल तर १ ते १ १/२ टीस्पून मिरची पूड + २ टीस्पून गोडा मसाला  वापरावा, चवीत फारसा फरक पडत नाही. मी सुद्धा बहुधा असाच वापरते. )

कृती:
तांदूळ आणि सर्व भाज्या धुउन  बाजूला ठेवाव्यात.
एका जाड बुडाच्या पातेल्यात तेल गरम करून मोहरी टाकावी. ती तडतडली की काजू, कडीपत्ता, हळद, हिंग टाकावा. सर्व भाज्या, शेंगदाणे, मनुका टाकून मिनिटभर परतून घ्याव्यात. नंतर त्यात तांदूळ, काळा मसाला आणि मीठ टाकून छान एकत्र करून जरा वेळ परतून घ्यावे. नंतर त्यात गरम पाणी टाकून १५ ते २० मिनिटे झाकण लाऊन मंद आचेवर भात शिजवावा.  मधेमधे हलक्या हाताने भात हलवावा.
हा भात प्रेशर कुकरमध्ये पण शिजवता येतो.
वाढताना वरून कोथिंबीर आणि खोबर आणि थोडस तूप टाकावे. गरमागरम भात मठ्ठ्या बरोबर वाढावा .


Monday, October 21, 2013

मठ्ठा

लग्नासारखे शुभ समारंभ असले कि मठ्ठा हा हवाच.  मसालेभात, कोशिंबीर, चटणी, पापड, पुरी-भाजी, भजी, जिलेबी आणि मठ्ठा … या शिवाय बेत अपुरा आहे नाही ! मग एवढ तुडुंब जेवल्यावर ते जिरवायला मठ्ठा हा हवाच.साहित्य:
ताक - ३ कप 
आल्याचा ठेचा- १/२ टीस्पून 
हिरवी मिरची, बारीक कापून किंव्हा खरडून- १ ते २
कोथिंबीर - १ टेबलस्पून 
जीरे पूड- १/२ टीस्पून 
मीरे पूड- १/४ टीस्पून 
साखर- १ टीस्पून 
सैंधव (सैंधव आणि पादेलोण एकत्र) किंव्हा साधं मीठ - चवीप्रमाणे 

कृती:
सर्व एकत्र करून रवीने चांगले घुसळून घ्या. थंडगार करून मग प्या. 
हल्ली खारी बुंदी टाकायची पद्धत आली आहे , छान  लागते. 
जिरे पूड व सैंधव च्या एवजी चाट  मसाला किंव्हा  जलजीरा मसाला  छान  चव येते. 

Saturday, October 19, 2013

कायस्थ प्रभू पद्धतीचा गरम मसाला

अस्सल खव्वये म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या सीकेपी (कायस्थ प्रभू) पद्धतीचा हा गरम मसाला आहे. काही अपवाद सोडल्यास हा खास मांसाहारी पदार्थांसाठीच वापरला जातो.    


Read this recipe in English.......click here.

साहित्य :

 • धणे- १/४ किलो 
 • त्रिफळ - ५० ग्रॅम
 • खसखस- ५० ग्रॅम
 • शहाजिरे- १० ग्रॅम
 • जायपत्री- १० ग्रॅम
 • नागकेशर- १० ग्रॅम
 • बडीशेप- ५० ग्रॅम
 • लवंग - १० ग्रॅम
 • दालचिनी- १० ग्रॅम
 • काळीमिरी- १० ग्रॅम
 • बाद्यान- १० ग्रॅम
 • जायफळ- १ नग
 • मसाला वेलची - १० ग्रॅम

कृती:
हे सर्व जिन्नस मंद आचेवर वेगवेगळे छान वास येईपर्यंत खमंग भाजून घ्यावेत. करपू नयेत. नंतर थंड झाल्यावर मिक्सर वर दळून घ्यावेत.

मसाला पूर्ण थंड झाल्यावर हवाबंद डब्यात/बरणीत भरून ठेवावा. 

हा गरम मसाला चिकन, मटण, कोलंबी, खेकडे तसेच अंडा करी साठी एकदम मस्त आहे.
शिवाय हरभरे, काळे वाटाणे, मसूर च्या आमटीत खूप छान लागतो. सुरणाच्या रस्सा भाजी साठी पण वापरतात.
ज्या भाज्यांना मटण रस्सासारखी चव हवी असेल त्या साठी हा उत्तम आहे.

हा मसाला जरा strong आहे, जपून वापरावा.
ज्यांना हा मसाला जास्तच strong वाटत असेल त्यांनी धन्याचे प्रमाण वाढवावे. पाव किलो एवजी अर्धा किलो घ्यावे.

Wednesday, October 16, 2013

मासळी विकत घेतानाची परिक्षा (Fish Test)

मासळी तर सगळ्यांनाच आवडते पण खरेदी करताना मनात अनेक शंका-कुशंका निर्माण होतात. भरपूर मोबदला मोजून घरी आणलेली मासळी चांगली निघेलच याची खात्री नाही. म्हणूनच काही सूचना इथे दिल्या आहेत. ९० % तरी त्या उपयोगास येतील. १० % अर्थातच तुमच नशीब.


 • मासे नेहमी चकचकीत दिसले पाहिजेत. कडक असावेत, कुजका वास नसावा. 
 • माश्याची खवले घट्ट असली तर ते ताजे, खवले सुटायला लागली असतील तर शिळे. 
 • माश्याचे कल्ले लाल भडक असायला हवेत, म्हणजे ते मासे ताजे आहेत. कल्ले काळपट असतील व मासे कापताना कुसकरत असतील तर ते शिळे मासे असतात. बोटांनी दाबले असता बोट आत जाते, ते मासे शिळे असतात. 
 • माशाचे तोंड उघडून पाहिल्यास लालसर भाग दिसल्यास मासे ताजे समजावेत. 
 • व काळसर दिसल्यास मासे शिळे व खराब समजावेत. 
 • ज्या कोलंबीची साल पटकन सोलली जातात ती शिळी असते. 
 • पापलेटचे कल्ले दाबले असता कल्ल्यातून पांढरे पाणी आले पाहिजे. लाल पाणी आले तर पापलेट शिळे आहे. पापलेटचा चंदेरी थर हाताला लागत असेल तर, ते पापलेट शिळे आहे. तसेच पापलेट शिळी व खराब होत आल्यास त्याना पिवळसर रंग येऊ लागतो. 
 • खेकडे विकत घेताना ते जिवंत, चालणारे व काळसर रंगाचे असले पाहिजेत. खेकडे घेताना खेकड्याची पाठ दाबून पहावी. पाठ कडक असल्यास खेकडे आतून मांसाने भरलेले असतात. जर खेकड्याची पाठ दबली गेल्यास खेकडे आतून पोकळ असतात व खाण्यायोग्य मासं त्यात मिळत नाही. 
 • अमावस्येच्या आसपासच्या दिवसांत मिळणारे खेकडे जास्त चविष्ट व मांसाने भरलेले असतात. 
 • शिंपल्याचा खूप कुजकट घाण वास येत असेल तर त्या शिळ्या असतात. ज्या कच्च्या असताना अजिबात उघडत नाहीत, त्या ताज्या असतात. ज्या उकडल्यावर उघडत नाहीत त्या खराब असतात. 
 • ओला जवळा घेताना पांढरा स्वच्छ रंगाचा ताजा घ्यावा. 
 • तांबूस सफेद रंगाची व घट्ट सालीची करंदी ताजी असते. 
 • कापलेला घोळ माश्याचा तुकडा लालसर गुलाबी असायला हवा, पांढरट- पिवळट नको. 
 • बोंबीलाचे तोंड लालसर असायला हवे, म्हणजे ते ताजे. पांढरट, पिवळट आणि लीबलीबित पडलेले बोंबील शिळे असतात. 
 • बांगडे शिळे व खराब झाल्यास त्याना पिवळसर रंग येऊ लागतो. काळसर रंगाचे चमकदार व घट्ट बांगडे ताजे असतात. तोंड उघडून पाहिल्यास लालसर रंग दिसणारे बांगडे ताजे असतात. 
 • भिंगी, सुरमई, रावस, कारली, हलवा विकत घेण्यापूर्वी घट्ट बघून घ्यावे. लिबलिबीत नको.  
 • पांढऱ्या स्वच्छ, घट्ट व चमकदार दिसणाऱ्या मुडदुशा (रेणव्या) ताज्या असतात. त्यांच्या तोंडाच्या आतील भाग लाल असतो. मुडदुशा शिळ्या व खराब झाल्या कि त्याना पिवळसर रंग येतो व त्या मऊ पडतात. 
 • पिवळसर सोनेरी रंगाची, घट्ट व तोंडाच्या आतील भाग लाल असलेली मांदेली ताजी असतात. मांदेली शिळी व खराब होऊ लागली कि तिला नारंगी रंग येऊ लागतो व त्या मऊ पडतात. 
 • काळसर चमकदार रंगाची व घट्ट बोय ताजी असते. जास्त मोठी बोय चवीला उग्र असते व हिरमुस वास असतो. 
 • कालवे घेताना पाढऱ्या रंगाची, मोठी व ताजी पाण्यात ठेवलेली घ्यावीत. शिळी कालवे त्याच्या पाण्यात विरघळायला लागतात, त्या पाण्याचा रंग पांढरट दिसतो व त्या पाण्याला वास येतो. छोटी कालवे साफ करायला व आतील खडकाची कच काढायला त्रास होतो व कचही जास्त असते. मोठी कालवे पटकन साफ करता येतात. 
 • आपण कितीही काळजी घेतली तरी मासे विकणारे काही लोक आपल्यापेक्षा जास्त हुशार असतात. पापलेट ताज दिसावं म्हणजेच कल्ल्यातून पांढरे पाणी याव म्हणून कल्ल्यात कालव भरतात. बोंबील लालसर दिसण्यासाठी त्याला लाल रंग चोळतात. शिळ्या माश्याच्या कल्ल्याला व कापलेल्या तुकड्यांना दुसऱ्या माश्यांचे रक्त लावतात, जेणे करून ते मासे ताजे दिसावेत. त्यामुळे सावधान राहाण गरजेचं आहे. शक्यतो ओळखीच्या व खात्रीच्या विक्रेत्याकडूनच मासे विकत घ्यावेत. अनेकदा रंगरूप सारखे असणारे दुसरे बनावट मासे आपल्या नेहमीच्या माश्याऐवजी विकतात.

माहितीचा स्त्रोत: आजी, आई, पप्पा आणि नचिकेत घरत.       

Saturday, October 12, 2013

Lal Bhopalyache Bharit (लाल भोपळ्याचे भरीत)

ब्राम्हणी पद्धतीच रुचकर अस हे भरीत. लाल भोपळा 'अ' जीवनसत्वाने भरपूर, खूप पौष्टिक आहे. गर्भारपणात भरपूर लाल भोपळा खावा. या भरीतातील काही पदार्थ वगळलेत तर उपवासाला चालेल. आमच्या शेजारी दातार आजी राहायच्या. त्यांनी माझ्या आईला हे भरीत करायला शिकवल. हे भरीत केल की नेहमी त्यांची  येते. 


Read this recipe in English..... Click here.

साहित्य:
 • लाल भोपळा- २५० ग्रॅम
 • हिरव्या मिरच्या, बारीक चिरून- ४ ते ५
 • कोथिंबीर, बारीक चिरून- १/४ कप
 • तेल- २ टेबलस्पून
 • मोहरी - १ टीस्पून
 • हळद- १/२ टीस्पून
 • हिंग- १/४ टीस्पून
 • दही- १/२ कप
 • साखर- चवीनुसार
 • मीठ- चवीनुसार 

कृती:
 • लाल भोपळ्याच्या साल काढून छोट्या फोडी/तुकडे करून घ्यावेत.  
 • भोपळ्याच्या फोडी कूकरमध्ये भांड्यात (डाळ आणि भाताच्या भांड्यावर ठेवल्या तरी चालतील) थोडेसे पाणी शिंपडून उकडून घ्याव्यात. 
 • चमच्याने मॅश करून घ्याव्यात. (उकडल्यावर भोपळ्यात जे पाणी असेल ते घेऊ नये पण टाकुही नये. आमटीसाठी/वरणासाठी वापरावे. त्यात जीवनसत्व असतात. )
 • थंड झाल्यावर मिरच्या आणि कोथिंबीर घालून निट मिक्स करावे.
 • कढल्यात/फोडणी पात्रात तेल गरम करावे. मोहरी आणि हळद, हिंग घालून फोडणी करून उकडलेल्या भोपळ्यात घालावी. लगेच झाकण ठेवावे. थोडावेळ झाकण तसेच ठेवून फोडणी त्यात मुरु द्यावी.   
 • जेवायच्या वेळेला दही घालावे. चवीनुसार मीठ आणि किंचीत साखर घालावी. छान मिक्स करावे. 

हे भरीत उपवासासाठी करायचे असेल तर …….
 • फोडणीत हळद, हिंग, मोहोरी घालू नये त्याएवजी जीरे वापरावे. 
 • तेलाएवजी तूप वापरले तरी चालेल. 
 • भरीतात वरून शेंगदाण्याचा कूट घातल्यास छान वेगळी चव येते.
 • कोथिंबीर तुमच्याकडे उपासाला चालत असेल तर घाला.