Thursday, February 15, 2018

मेथीगोळ्यांची रस्सा भाजी

मेथीच्या भाजीला नाक मुरडणारे सुद्धा हि भाजी आवडीनं खातात असा अनुभव आहे. कडूपणा अजिबात जाणवत नाही. गरमागरम भाकरीसोबत तर मेथीगोळ्यांची रस्सा भाजी फारच छान लागते.साहित्य -
मेथी गोळे बनवण्यासाठी:
 • बारीक चिरलेली मेथी - १ ते सव्वा कप
 • बेसन किंवा भाजणी- १/२ ते पाऊण कप
 • तीळ- १/२ टीस्पून
 • घरगुती मसाला किंवा लाल तिखट - १ टीस्पून
 • हळद- १/२ टीस्पून
 • मीठ - चवीनुसार

रस्सा बनवण्यासाठी:
 • तेल - ३ टीस्पून 
 • मोहरी - १/२ टीस्पून 
 • जिरे - १/२ टीस्पून 
 • हिंग - १/२ टीस्पून 
 • हळद - १/२ टीस्पून 
 • कांदा- १ मध्यम (१/२ कप)
 • लसूण पेस्ट किंवा भरड - २ टीस्पून 
 • घरगुती मसाला किंवा काळा मसाला - ३ टीस्पून किंवा ( १ १/२ टीस्पून मिरची पूड+ १ टीस्पून गरम मसाला + १/२ टीस्पून धणे पूड)
 • भाजलेल्या सुक्या खोबऱ्याचे वाटण- १ टीस्पून (कारण हा रस्सा पातळच असतो आणि गोळ्यातील बेसन पण रश्श्यात उतरून थोडा घट्टपणा येतो.)
 • मीठ - चवीनुसार

कृती-
 • मेथी निवडून स्वच्छ धुवून घ्यावी. चाळणीवर टाकून निथळुन घ्यावी व बारीक चिरून घ्यावी.
 • मेथी गोळे बनवण्यासाठी लागणारे सर्व साहित्य एकत्र करून घट्टसर पीठ भिजवावे. 
 • एका कढईत तेल तापवून त्यात मोहरी व जिऱ्याची फोडणी करावी. त्यात कांदा आणि लसुण घालून गडद तपकिरी रंगावर परतून घ्यावे. 
 • त्यात हळद, हिंग, मसाला घालून थोडा वेळ परतून घ्यावे. 
 • त्यातच खोबऱ्याचे वाटण घालून तेल सुटेपर्यंत परतावे. 
 • त्यात साधारण २ वाट्या पाणी घालून उकळी आल्यावर त्यात मेथीचे छोटे छोटे गोळे एक-एक करीत सोडावेत. 
 • उकळी आल्यावर झाकून २-३ मिनिटे वाफवावे. 
 • गॅस बंद करून रस्सा झाकून ठेवावा म्हणजे रस्सा गोळ्यात मुरेल. गरमागरम ज्वारीच्या किंवा कुठल्याही भाकरीसोबत सर्व करावे. 
टिपा-
 • गोळे बनविताना त्यात तिखटाऐवजी वाटलेली हिरवी मिरचीही वापरता येइल. 
 • प्रथम गोळे तळून नंतर रश्श्यात सोडता येतील.